सिंगापूरची बिकट वाट वहिवाट

भोरला पोहचलो तरी अजिबात पुण्याला परतावसे वाटत नव्हते. भोरच्या स्टॅंडवरच कॉफीचे पेले रिचवत, मन अजूनही त्याच दर्याखोर्यात रेंगाळत होते. गेल्या दोन दिवसात तुडवलेल्या रानवाटा, उतरलेल्या घाटवाटा, रायलिंग पठारावरची हळवी करून जाणारी संध्याकाळ, सिंगापूरच्या नाळेतील क्षणभर ठोका चुकवणारी घसरडी वाट, काळ नदीचे अद्भुत पात्र, वाळणडोहाचा चमत्कार, मोरे दाम्पत्याची आपुलकी , पाठीवर वाहिलेले जड पित्ठू, भरून आलेल्या पोटऱ्या , सिंगापुरातून मध्यरात्री पहिलेले काळेशार चांदणं........ पुढचे काही आठवडे तरी पुरणार होते... सिंगापूर गावात जाणारा रस्ता ज्याची सुरुवात भट्टी गावाच्या पुढील कुसारपेठ खिंडीतून होते. सिंगापूर..... राजगडावरच्या एका लोभस संध्याकाळी, पद्मावती मंदीरासमोरच्या पटांगणात रंगलेल्या गप्पांमध्ये एक अनामिक वाटसरू माहिती देऊन गेला या वाटेची. म्हणतात ना (म्हणजे मीच म्हणतो) आडवाटेवरच्या वाटा आडरानात कळतात तशातला हा प्रकार...तेव्हापासून या वाटेची स्वप्न पडू लागली. ते दिवस डोंगर भटकंतीच्या इव्हेंटचे झाले नव्हते. ट्रेकिंगचे सोहळे आणि सण झाले नव्हते...