रतनगड ते हरिश्चंद्रगड कात्राबाईच्या साक्षीने....

रतनगड ते हरिश्चंद्रगड ट्रेकचा भव्य पॅनोरमा , उजव्या हाताचा कलाडगड , मागे घनचक्कर-कात्राबाई-आजोबा पर्वतांची रांग सह्याद्रीच्या वाटा धुंडाळण्याचे हे वेड अंगवळणी पडत चाललंय. एकदा एखाद्या नवीन गडकोटाची, घाटवाटेची वारी घडली, की अजून नवनवीन वाटा गवसतात. मग या घाटवाटा खुणावू लागतात. मनात सतत रुंजी घालणाऱ्या या घाटवाटा, हे दुर्गसखे जोपर्यंत सर होत नाही तोपर्यंत ध्यानी,मनी तेच दिसू लागते. रतनगडावरून एक वाट कात्राबाईच्या खिंडीमार्गे मुळा नदीच्या स्वर्गीय खोऱ्यात उतरते आणि तिथून ती कलाडगडाला वळसा मारून थेट भटक्यांच्या पंढरीत हरिश्चंद्रगडला पोचते. खूप वर्षापूर्वी या भागात फिरताना या वाटेबद्दल ऐकले होते. या निमित्ताने नकाशावर ही वाट पाहिली होती, गुगलवरच्या फोटोमध्ये अनुभवली होती, पण प्रत्यक्षात या वाटेला आमचे पाय लागले नव्हते. यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर ते लागले. एक दणदणीत ट्रेक नावे लागला आणि कष्ट सार्थकी लागले. रतनगडाच्या पायथ्याचे अमृतेश्वर मंदिर रतनगडाच्या पायथ्याचे मुक्कामाची उत्तम सोय असलेले मारुती मंदिर महिनाभरापासून या ट्रेकचा कट शिजत होता आणि तीन, चार दिवसाचा ...