आणखी एक “जब्या”

fandry चित्रपटात शेवटच्या प्रसंगात जब्या एक दगड भिरकावतो आणि चित्रपट संपतो. माझ्या मनात एक प्रश्न रेंगाळत राहतो तो म्हणजे आता या भिरकावलेल्या दगडानंतर , हा जब्या लई मार खाणार. त्याचीच पुढची भीषण आवृत्ती म्हणजे नगरमधील खर्डा येथील घटना. नितीन आगे नावाच्या अवघ्या १७ वर्षीय दलित मुलाला लाकडी हातोड्यानी आणि गरम सळयांनी चटके देऊन निर्घृण प्रकारे मारण्यात आले आहे त्यामुळे आपल्याच पुरोगामी महारष्ट्रात खद्खद्णारे भीषण वास्तव पुन्हा एकदा उफाळून आले आहे. याचा गुन्हा तो काय तर या नितीनने तथाकथित उच्चवर्णीय (जातीच उल्लेख मुद्दाम टाळत आहे) मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला. आणि हे सहन ना होऊन त्या मुलाला त्या मुलीच्या नातेवाईकांनी सर्व गावादेखात मारझोड करत जवळच्या डोंगरावर नेऊन हाल हाल करून मारले आणि नंतर झाडाला टांगले. आता अनेक चर्चा घडतील , आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतील. मूळ प्रश्न बाजुला ठेवून राग संतापाच्या नावाखाली एकमेकांना शाल जोडीतले हाणले जातील. नितीन तर काय परत येणार नाही आणि ऐन जवानीतील पोर गमावल्याचा दुखः त्यांच्या आई बापाशिवाय कोणाला कळणार नाही (तथाकथित जय भीम , जय शिवाज...