आणखी एक “जब्या”
fandry चित्रपटात शेवटच्या प्रसंगात जब्या एक दगड भिरकावतो आणि
चित्रपट संपतो. माझ्या मनात एक प्रश्न रेंगाळत राहतो तो म्हणजे आता या
भिरकावलेल्या दगडानंतर, हा जब्या लई मार खाणार. त्याचीच पुढची
भीषण आवृत्ती म्हणजे नगरमधील खर्डा येथील घटना.
नितीन आगे नावाच्या अवघ्या १७ वर्षीय दलित मुलाला
लाकडी हातोड्यानी आणि गरम सळयांनी चटके देऊन निर्घृण प्रकारे मारण्यात आले आहे
त्यामुळे आपल्याच पुरोगामी महारष्ट्रात खद्खद्णारे भीषण वास्तव पुन्हा एकदा उफाळून
आले आहे. याचा गुन्हा तो काय तर या नितीनने तथाकथित उच्चवर्णीय (जातीच उल्लेख
मुद्दाम टाळत आहे) मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला. आणि हे सहन ना होऊन त्या मुलाला
त्या मुलीच्या नातेवाईकांनी सर्व गावादेखात मारझोड करत जवळच्या डोंगरावर नेऊन हाल
हाल करून मारले आणि नंतर झाडाला टांगले.
आता अनेक चर्चा घडतील, आरोप
प्रत्यारोपांच्या फैरी झडतील. मूळ प्रश्न बाजुला ठेवून राग संतापाच्या नावाखाली
एकमेकांना शाल जोडीतले हाणले जातील. नितीन तर काय परत येणार नाही आणि ऐन
जवानीतील पोर गमावल्याचा दुखः त्यांच्या आई बापाशिवाय कोणाला कळणार नाही (तथाकथित
जय भीम, जय शिवाजी आणि जय परशुराम म्हणणार्यांनी कितीही गळे
काढले तरी सगळ्यांचा दिवस उद्यापासून रोजच्या सारखाच सुरु होऊन सारखाच मावळणार)
मग प्रश्न राहतो तो घडलेल्या घटनेचा, दोष कोणाचा ? जातीचा कि मनोवृत्तीचा ?
हा माज ही मुजोरी , त्या पोराला मारहाण होत
असताना बघ्यांचा षंढपणा या सगळ्या गोष्टी मनोवृत्तीशी जोडलेल्या असतात. कारण
मनोवृत्तीचा संबंध जातीशी लावला तर मग सगळ्याच जाती गुन्हेगार ठरतात. उत्तर
प्रत्येकाने शोधायचंय स्वतःपुरता. ज्या जातीत जन्माला आलो ती जात तर पुसणं शक्य
नाही कोणालाच, पण विसरणं नक्कीच शक्य आहे.जातीचे भांडवल करणे
मात्र नक्कीच बंद करता येईल. (मग भंगी असो वा बामन असो वा महार) “शिका आणि संघटीत व्हा” हा बाबासाहेबांचा संदेश हा
एका जातीपुरता मर्यादित कधीच नव्हता , आपण शिकतो पण संघटीत
होण्याची वेळ आली कि अजूनच विखुरतो जाती पाती आणि अस्मितेच्या जंजाळात.
ज्या मुजोरीच्या आणि द्वेषाच्या मानसिकतेतून ही घटना
घडली त्या मानसिकतेला मात्र दहशत ही बसलीच पाहिजे पण त्याहून धाक बसला पाहिजे तो
या जातिव्यवस्थेच्या पाईकाना. जे प्रत्येक गोष्टीत जात शोधत असतात. “लेखणीतून समाज प्रबोधन वगैरे घडवायचा माझा अट्टाहास बिलकुल
नाही” तसा इरादाही नाही.एकाच अस्तिमेला घट्ट धरून ,लोकांच्या आडनावावरून त्याची विचारसरणी आधीच ठरवणाऱ्या घोळक्यात प्रत्येकच
असतो एक “स्वयंघोषित भगतसिंग” (नशीब
त्या भगतसिगाचे, त्याची जात कोणी विचारत नाही) तुमच्या
आजूबाजूला असे ‘घोळक्यातले वाघ’ तुम्हाला
भरपूर आढळतील तेव्हा सावध राहा त्यांच्यापासून. जातविरहित समाज ही सगळ्यांचीच
जवाबदारी आहे हे लक्ष्यात घ्या अन्यथा सुपातून जात्यात यायला वेळ लागणार नाही.
So true. We need to unite!
ReplyDeleteNicely written!
>जातविरहित समाज ही सगळ्यांचीच जवाबदारी आहे हे लक्ष्यात घ्या अन्यथा सुपातून जात्यात यायला वेळ लागणार नाही.<... सगळ्यांत महत्त्वाचं वाक्य हे.
ReplyDelete- सतीश स. कुलकर्णी
sakul05@gmail.com