देवराईची रानभुली

या निसर्गचित्रात आम्ही मंत्रमुग्ध होऊन हरवून जात असतानाच समोरच्या फणसाच्या झाडामागे जाणवलेली पल्लेदार आणि लांबलचक सळसळ देवराई जिवंत करून गेली. इथे पायाखालची जमीन ही जमीन नव्हतीच ती पर्णशय्या बनली होती. काही सहस्रकांपासून तिथे ती पाने ,फांद्य साचून त्या तिथेच रुजल्या होत्या. निसर्गाचे चक्र तिथे काटेकोरपणे पाळाले जात होते. अर्थात इथे पडलेली वाळकी फांदीही ना उचलण्याचा नियमच होता तो प्राचीन काळापासून चालत आलेला. इथे राहणारे वनवासीदेखील बिनचूकपणे तो पाळत होता. निसर्ग आणि माणसाचे सहजीवन इथे सहज फुलले होते. रानात वसलेले वेताळ आणि आवजाई जोडीने साक्षीदार होते या सहजीवनाचे !! ---------------------------------------- घाटातील दृश्य त्या जंगलात बरेच वेळा जाणे झाले आहे. उन्हाळा, पावसाळा हिवाळा तिन्ही ऋतुंमध्ये इथल्या वाटांवर मुक्त भटकंती करण्याची संधी मिळाली होती. रात्री अपरात्री हे जंगल अनुभवलं होता, पहिल्यांदाच इथे आलो होतो तेव्हा वाट चुकून या जंगलात हरवलो होतो. एकदा उन्हाळ्यात एकटाच अख्खा घाट चढून आलो होतो फक्त नवीन घेतलेल्या कॅमेऱ्याचा पहिला फोटो इथुनच काढायचा होता म्हणून !!! ...