देवराईची रानभुली


या निसर्गचित्रात आम्ही मंत्रमुग्ध होऊन हरवून जात असतानाच समोरच्या फणसाच्या झाडामागे जाणवलेली पल्लेदार आणि लांबलचक सळसळ देवराई जिवंत करून गेली. इथे पायाखालची जमीन ही जमीन नव्हतीच ती पर्णशय्या बनली होती.  काही सहस्रकांपासून तिथे ती पाने ,फांद्य साचून त्या तिथेच रुजल्या होत्या. निसर्गाचे चक्र तिथे काटेकोरपणे पाळाले जात होते. अर्थात इथे पडलेली वाळकी फांदीही ना उचलण्याचा नियमच होता तो प्राचीन काळापासून चालत आलेला. इथे राहणारे वनवासीदेखील बिनचूकपणे तो पाळत होता. निसर्ग आणि माणसाचे सहजीवन इथे सहज फुलले होते. रानात वसलेले वेताळ आणि आवजाई जोडीने साक्षीदार होते या सहजीवनाचे !!
----------------------------------------
घाटातील दृश्य

त्या जंगलात बरेच वेळा जाणे झाले आहे. उन्हाळा, पावसाळा हिवाळा तिन्ही ऋतुंमध्ये इथल्या वाटांवर मुक्त भटकंती करण्याची संधी मिळाली होती. रात्री अपरात्री हे जंगल अनुभवलं होता, पहिल्यांदाच इथे आलो होतो तेव्हा वाट चुकून या जंगलात हरवलो होतो. एकदा उन्हाळ्यात एकटाच अख्खा घाट चढून आलो होतो फक्त नवीन घेतलेल्या कॅमेऱ्याचा पहिला फोटो इथुनच काढायचा होता म्हणून !!!  या जंगलाचे उत्तर टोक बरेच दिवस खुणावत होते. इथून खाली उतरणाऱ्या घाटवाटाचे वेध लागले होतेच त्यापेक्षाही उत्सुकता लागून राहिली होती ती
इथल्या देवराईची !!
गडद धुक्यातील वाट वेळ दुपारची १२ वाजता

या सगळ्या आठवणी उराशी घेऊन यंदाचा बेत ठरला आणि पहाटे चारला मोटरसायकल महामार्गाला लागली. महामार्ग सोडून धरणाचा फाटा ओलांडला तसा रस्ता हळूहळू वर डोंगरात चढू लागला,
हवेतला दमटपणा जाऊन गारवा अंगाशी खेळू लागला. घाट चढून आल्यावर मात्र सहयाद्रीच्या पुढच्या मागच्या दोन्ही रांगा स्पष्ट दिसू लागल्या, नजर हटणार नाही तिथपर्यंत या रांगा वेलींप्रमाणे एकमेकांत गुंतून गेल्या होत्या. सह्याद्रीची विशालता इथे दिसून येत होती. या रांगांमध्ये पसरला होता अथांग जलाशय,
येताना या जलायशयालाच चिकटून आम्ही आलो, पाणी इतका तुडुंब भरला होता येतानाचा रस्ता जाताना पाण्याखाली जातो की काय अशी भीती वाटत होती.
हिरव्या कॅव्ह्वासवरील काळी रस्त्याची काळी रेघ

डोंगराच्या पायाशी आणि पाण्याच्या शेजारून तो रस्ता तुरु तुरु पळत होता. लहान असताना एकमेकात शिरलेले डोंगर आणि मधून वाहणारी नदी यांचे जे  चित्र आपण काढतो  ते चित्र इथे डोळ्यासमोर तंतोतंत उभे होते !!! डोंगराच्या पोटात कोरून काढलेला हा रस्ता अप्रतिम तर होताच पण सुदैवाने त्याला शहरी पर्यटनाची म्हणावी तितकी झळ लागलेली नव्हती. आज सह्यादीने त्याची सगळीच रूप आमच्यासमोर मांडायचा बेत केला होता.
जसा डोंगर सुरू झाला तसा वातावरणात लगेच फरक झाला.
इतका वेेळ चमचमणारे पाणी गायब होऊन आता आम्ही डोंगराच्या पोटात शिरू पाहत होतो. श्रावण संपत आला होता, निसर्गालाही वेध लागले होते ते भाद्रपदाचे !! उन्हाचे सुखद उबदार कवडसे जाऊन त्यांची जागा मळभाने घेतली होती. सूर्यप्रकाश जाऊन तिथं हळूहळू धुके पसरू लागले होते.
पाण्याची निळाई जाऊन तिथे गवताची हिरवळ पसरली होती. सह्याद्रीच्या रंगमंचावर ऋतुमानानुसार बदलणारी ही सर्व पात्रे त्यांची भूमिका चोख बजावत होते.
सह्याद्रीच्या कातळकडे

या अशा रानभूलीच्या रस्त्यावरून आम्हाला वेध लागले होते ते देवराईचे, काळाच्या ओघात नष्ट होत चाललेल्या या निसर्ग वैभवाची ती एक खूण होती जी आपल्या अस्तित्वाला थेट आपल्या अनादी अनंत काळाशी जोडत होती. खूप जुनी होती आणि प्राचीन काळापासून मानवी हस्तक्षेपपासून लांब होती. मुळात इथले अरण्यच इतके निबड होते की त्याच्या जंजाळात शिरणे म्हणजे एक दिव्यच !! इथल्या झाडाच्या वेलींच्या जाळीमध्ये शिरणे म्हणजे जीववरचा खेळ होता.

धुक्याच्या पांढऱ्या रंगात गडद झालेल्या या रस्तावर डोळ्यासमोरचे दोन फुटपालिकडचे काही दिसणं अशक्य झाला होता. मधेच एखादा गाव ,वस्ती ,पाडा लागत होता पण अर्थातच मानवी अस्तित्वाच्या खुणा दिसत नव्हत्या. हळूहळू दाट अरण्याचा पट्टा सुरू झाला.  जेमतेम दहा फुटी रस्ता आणि त्याच्या दोन्ही बाजूनी उभी राहिलेली शेवाळळेली खोडं , त्यांच्या फांद्या एकमेकात गुंफून उभ्या होत्या, धुक्यात त्या खोल खोल वाटत होत्या, सह्याद्रीच्या मस्तकी पसरलेले हे अरण्यापट्टे त्यांच्या दुर्गमतेमुळे सुखरूप राहिले होते.
एका वळणावर धुकं कमी झालं तसा आजूबाजूचा परिसर दिसू लागला, नेमका तेव्हाच शेजारच्या डोंगरावर डोक्यावर इरल्या घेतलेल्या काही मानवी आकृत्या स्तब्ध उभ्या दिसल्या. रानात गुरे चरायला सोडून त्यांच्या राखणीला उभी थकलेली ती गुराखी मंडळी आणि तो सगळा आसमंत इतका विस्मयकारी होता की आपण महाराष्ट्रात नसून कुठल्यातरी अगम्य प्रदेशात आलो आहोत असे क्षणभर वाटून गेलं. धुक्यात दिसणाऱ्या स्थिर आकृत्या गूढ भासत होत्या. या गुढतेत भर घालत होती ती बाजूच्या जंगलातून साद घालणारी  मलबार व्हिसल थ्रूशची एक लयीत चाललेली शीळ !!

धुक्यान वेढलेला तो रस्ता संपूच नये असे वाटत होते. देवराई जवळ येत चालली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूचे चर पाण्याने तुडुंब भरले होते. ते डाव्या बाजूच्या दरीत कोसळत होते, पाण्याच्या प्रवासाचा तो ध्वनी जंगल जिवंत करत होता.
बहुधा डोंगराच्या बेचक्यातुन आम्ही प्रवास करत होतो त्यामुळे धुकं असा साचून राहिला होता, खालच्या दरीतून धुक्याचे लोट वर अव्याहतपणे वर येत होते. रस्ता म्हणजे हिरव्या कॅनव्हासवर फिरवलेली काळी रेघ होती. हीच काळी रेघ आम्हाला अलगद घेऊन गेली ती देवराईच्या पोटात !!!
आता सह्याद्रीचा तिसरा अध्याय सुरू होणार होता.
देवराई १

देवराई , देवराई म्हणतात ती हीच !! आजपर्यंत देवराई बघितली नव्हती अशातली गोष्ट होती का ? तर नाही !! पण देवराई म्हणलं की का कुणास ठावूक असं एक आतून जाणीव येत होती की या जागेवर पोहचला की कोणीतरी आपल्याला बोट धरून आपल्या पूर्वांजांशी थेट जोडत आहे. देवराईमध्ये गेली अनेक सहस्त्रके शांतता नांदत होती, कित्येक हजारो वर्षपासून ती तशीच नांदत असणार. ती शांतता बोलकी होती. थेट आभाळात शिरलेल्या उंचच उंच सरळ खोडांनी जमीन आणि आकाशामध्ये एक नक्षीदार जाळी विणली होती. या जाळीतून खाली येणारा पावसाचे रूपांतर धवलकणात होत होते. हिमवर्षावसारखे ते आमच्या शरीरभर पसरत होते. पापण्यांच्या केसात अडकलेले ते पावसाचे ते कण अत्यंत देखणे दिसत होते. या निसर्गचित्रात आम्ही मंत्रमुग्ध होऊन हरवून जात असतानाच समोरच्या फणसाच्या झाडामागे जाणवलेली पल्लेदार आणि लांबलचक सळसळ देवराई जिवंत करून गेली. इथे पायाखालची जमीन ही जमीन नव्हतीच ती पर्णशय्या बनली होती. काहीशे , काही सहस्रकांपासून तिथे ती पाने ,फांद्य साचून त्या तिथेच रुजल्या होत्या. निसर्गाचे चक्र तिथे काटेकोरपणे पाळाले जात होते. अर्थात इथे पडलेली वाळकी फांदीही ना उचलण्याचा नियमच होता तो प्राचीन काळापासून चालत आलेला. इथे राहणारे वनवासीदेखील बिनचूकपणे तो पाळत होता. निसर्ग आणि माणसाचे सहजीवन इथे सहज फुलले होते. रानात वसलेले वेताळ आणि आवजाई जोडीने साक्षीदार होते या सहजीवनाचे !!

देवराईत शिरल्या शिरल्या आजूबाजूच्या आणि इथल्या तापमानातला फरक प्रकर्षाने जाणवला होता. पावसाळ्यामुळे एक प्रकारचा दमटपणा साचून राहिला होता त्या झाडोर्यात. सह्याद्रीच्या माथ्यावर वसलेली हि देवराई अभयारण्याचा भाग असल्यामुळे बचावली होती. मुळात देवराईची नाजूक संकल्पना लोप पावत चाललेली असताना. पर्यावरणाचा अत्यंत नाजूक पण तितकाच महत्वाचा भाग असलेली हि व्यवस्था म्हणजे आपले पूर्वज किती दूरदृष्टीचे होते याचे भक्कम उदाहरण होते.
देवाच्या नावाने सोडलेले जंगल म्हणजे देवराई इतका साधा सोपा पुस्तकी अर्थ आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असला तरी इथल्या प्रत्येक देवराईमध्ये असलेली स्थानिक देवता मग ती कधी विंझाई असेल कधी कार्लेश्वरी कधी वाघाई कधी शिरकाई हि स्त्री रुपीच होती.
प्रत्येक देवराईमध्ये स्त्रीरूपी देवता का वसलेली असते याचे उत्तर तूर्त तरी माझ्याकडे नव्हते पण हे निरीक्षण मात्र पक्के होते. या देवराईमधले वाळकि काटकी जरी उचलली तरी या देवीचा कोप होतो असा धाक होता आजही हा समाज आपण ज्यांना खेडूत किवा अंधश्रद्धाळू म्हणून उपहासिक पद्धतीने हिणवतो तो बाळगून होता. आपल्याला जी अंधश्रद्धा वाटते त्याच अंधश्रद्धेमुळे आज ज्या काही देवराया पश्चिम घाटात उरलेल्या आहेत त्या टिकून आहेत. यांचा अभ्यास करणे महत्वाचे आहे हे पुन्हा एकदा जाणवले.

देवराईमध्ये रेंगाळत असताना एक परिचित आवाज कानावर येऊ लागला तेव्हा नजर आपसूक त्या उंच झाडांच्या शेंड्याकडे भिरभिरू लागली आणि  शेकरूच्या जोडीने दर्शन दिले. बऱ्याच वेळ ते डोक्यावर भिरभिरत राहिले. कॅमेरा काढून मोठी लेन्स लावून सगळे सोपस्कार पूर्ण करेपर्यंत शेकरूच्या जोडीने सहकार्य केले आणि काही सुंदर फोटो मिळाले. महाराष्ट्राचा राज्य प्राण्याचे त्य रानातले आस्तित्व खूप काही सांगून जात होते.  शेकरू सहसा जमिनीवर उतरत नाहीत. पन्नास , साठ, सत्तर फूट उंचीच्या झाडांवरच त्यांचे वास्तव असते. एका वेळी अनेक घरटी बांधून ती राहतात. मानवी अधिक्षेप झाला कि ते नाहीशे होतात.
ज्या देवराईसाठी अट्टाहास केला होता ती प्रसन्न झाली होती.

आता दुपारचे ३ वाजले होते लवकरच तिथून हलणे क्रमप्राप्त होते. माघारीचा पट्टा बिकट होती. तेव्हाच या राईमध्ये धुकाच्या लोट शिरला आणि आणि ती झाडे आणि धुक्यानी मिळून एक अद्भुत black and white सेट तयार केला. झाडांमधून, पानांमधून, फाद्यांमधून , वेलींच्या जाळीतून सगळीकडून ते शुभ्र धवल धुके पाझरू लागले. देवराईमध्ये आम्ही चारी दिशांना पांगलो होतो . त्य दृष्यात आमच्या काळ्या आकृत्या आणि शुभ्र धुके असा एक देखणं आकृतिबंध तयार झाला होता. भर दुपारी साडेतीन वाजता धुक्याचा हा खेळ झकास रंगला होता.
या ठिकाणी मनसोक्त फोटो मिळाले. प्रकाशयोजना, चौकटी सारे काही निसर्गाने आधीच तयार करून ठेवले होते. आम्हीच मॉडेल होतो आणि आम्हीच छायाचित्रकार ! मनसोक्त हुंदडून झाल्यावर पाय निघत नसताना तिथून निघणे भाग होते. वेळेची गणित पाळणे बंधनकारक होते.
अस्मादिक

देवराईच्या पुढचा कडा खाली कोकणात उतरत होता. इथून खाली जाणार्या घाटवाटा अशाच सुंदर होता. घाटवाटांना खेटूनच तीन चार किल्ले उभे होते. पावसाळा असल्याने एक मोठा धबधबा सहाशे सातशे फूट खोल दरीत कोसळत होता. हे सगळे वैभव त्य एवलूष्या खेड्याला लाभले होते. हे सगळे सौंदर्य डोळ्यांनी साठवत आम्ही देवराईचा निरोप घेतला. पुढच्या वेळेसच्या घाटवाटांचा बेत पक्का झाला होता.
माघारी परतताना धुक्याची आणि पावसाची सांगत होतीच. अखेरीस जेव्हा घाट उतरला तेव्हा नजारा बदलला, वाटेत चहा भज्यांचा फक्कड बेत पार पडला. सश्याच्या शिकारीचे आमंत्रण मिळाले. आठवड्यापूर्वी तिथल्या विहिरीत सांबर कसे पडले होते याची माहिती मिळाली.
पुन्हा तो पाण्याला बिलगून धावणारा रस्ता वगैरे मागे टाकत आम्ही महामार्गाला लागलो. वाटेत अवघ्या १४० रुपयात अस्सल चुलीवरचा जेवण गावरान चिकन आणि बाजरीच्या भाकरीचा बेत म्हणजे संपूर्ण प्रवासाचा Climax होता.

घरी पोहचायला ११:३० वाजले.
सुटीचा मिळणारा एक दिवस, पहाटे ४ वाजता सुरु केलेला मोटरसायकलचा प्रवास, दिवसभरात साडेतीनशे किलोमीटरची दौड, धुक्यातले रस्ते, धुवाधार पाऊस, सह्याद्रीचे सरळ ताशीव कड्यांचे मंत्रमुग्ध करणारे दर्शन, देवराईशी झालेले हितगुज हे सर्व सुट्टीचे काही मिळणारे तास सार्थकी लावण्यासाठी पुरेसे होते.
-----------------------------------------------------

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मेंगाईसोबतची रात्र

कासवांचे गाव

The Neighbour Side -- Visit to Pakistan High Commission