गड गुदमरतोय

प्लास्टिकच्या पिशव्यांनी भरलेली पाण्याची टाकी, दारूच्या बाटल्यांचा खच, खरकट्या पत्रावळी या सगळ्याच्या गराड्यात अडकलेला हरिश्चंद्रगड हे महाराष्ट्रातल्या गडकिल्लांच्या दुरावस्थेचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. या कचऱ्यामुळेच हरिश्चंद्रगडावर मुक्काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाचे स्वागत केले जात असले तरी ट्रेकर्समध्ये अस्वस्थता पसरली आहे. गडकिल्ल्यांवरचा वाढत जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी नाही झाले तर बाकीच्या किल्ल्यावरही मुक्कामास बंदी येऊ शकते. एकुणात ट्रेकर्सचे लाडके आणि हक्काचे असलेले हे गडकोट त्यांच्यापासून दुरावणार का ? अहमदनगर, पुणे आणि ठाणे या तीन जिल्ह्याच्या सीमेवर एैसपैस पसरलेला हरिश्चंद्रगड हा भटक्यांची सर्वार्थाने 'पंढरी'. वर्षानुवर्षे येथे गडकऱ्यांचा राबता अव्याहतपणे सुरू आहे. गडावर असलेला मुबलक पाणीसाठा, मुक्कामासाठी उपलब्ध गुहा, एैसपैस पसरलेली वनसंपदा, ऐतिहासिक मंदिर यामुळे बारा महिने अभ्यासक, ट्रेकर्स, फोटोग्राफर्स यांची मांदियाळी येथे जमलेली असते. हरिश्चंद्रगडावरचा कोकणकडा म्हणजे सह्याद्रीचा अदभुत आविष्कार, पावसाळा सुरू होण्याच्य...