कासवांचे गाव

पहाटेची शांत वेळ... समुद्रावरचा थंडगार खारा वारा अंगाला बोचत होता. समुद्राच्या लाटांची गाज आसमंतात भरुन राहिली होती. अजून पुरेसे उजाडले नव्हते तरी समुद्रावर हळूहळू माणसं गोळा होऊ लागली होती. माणसं म्हणजे लहान मुलांपासून ते वृध्दांपर्यंत सगळीच होती. वेगवेगळ्या प्रांतातून , प्रदेशातून आलेली माणसं ती, काही तर परदेशातून पण आली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उत्सुकता दाटून राहिली होती. किनाऱ्यावर उभारलेल्या खोपटामध्ये दहा-बारा टोपल्या गोणपाट घालून झाकून ठेवल्या होत्या. त्याच्या भोवती जाळीचे कुंपण उभारले होते. त्याच्या आजूबाजूला माणसे कोंडाळे करुन आपपल्या जागा आडवून बसून राहिली होती. तेवढ्यात गावातले कार्यकर्ते लगबगीने आले आणि तडक खोपटात शिरले. तेथे झाकलेल्या टोपल्या ते एक एक करुन उघडून पाहू लागले... खोपटाबाहेरच्या माणसांची उत्कंठा शिगेला पोचली होती. टोपल्यांखाली नेमके दडले तरी काय होते ? शे-दोनशे माणसं भल्या पहाटे किनाऱ्यावर कशाल जमली होती ? दोन टोपल्या उघडल्या तरी पदरी निराशाच पडली... तिसरी टोपली उघडली आणि खोपटाबाहेरच्या माणसांचा एकच गलका उडाला. तिसऱ्या टोपलीखालून इवली इवलीशी ...