खांडस ते भोरगिरी (भाग १)

“सूर्याच्या आगीत भाजून निघालेला पण अंगावर फ़ुलपाखरांप्रमाणे भरगच्च सौंदर्यचिन्हे- रुपाची, नादाची व सुगंधाची- धारण करणारा, चैत्रसखा वैशाख. या पेटलेल्या वैशाख वणव्यात आम्हाला वेध लागले होते ते भोरगिरी वरून खांडसला उतरायचे. असे उरफाटे बेत तडीला न्यायला लोकही तशीच उरफाटी लागतात.

या सह्याद्रीवरच्या कपारीत घुमण्यासाठी, हि भटकंती करण्याची ताकद माझ्या पोटाऱ्या आणि मांड्यांमध्ये कायम राहू इतकेच काय ते मागणे !! जंगल मला आवडता , भावते !! ते मला कळतं, वाचता वगैरे येत हा काही माझा दावा नाही. किल्ल्याच्या ओढीने, नादाने फिरता फिरता या सह्याद्रीच्या पायवाटांवर हळूहळू अरण्यवाटा येऊन मिळाल्या त्यातून थोडीफार ओळख होत आहे !! महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात आज जी काय थोडीफार जंगले उरली आहेत त्यातलाच एक देखणा आणि विस्तृत जंगलाचा पट्टा म्हणजे ही भीमाशंकरचे जंगले , राजगुरुनगरपासून सुरु होऊन थेट कल्याण मुरबाड लोणावळा आणि काळसूबाईपर्यंत पसरलेला !! हे लिहित असताना कालच्याच बुद्ध पौर्णिमेला भीमाशंकरला प्राणी गणती झाली. बिबट्याचे आस्तित्व इथे पुन्हा जाणवले. इथल्या जंगलात वाघ होता. अगदी ९० ते ९५ पर्यंत होता. डॉ. राजा दांडेकरांनी या जंगलात स्वतः पट्टेरी वाघ पहिल्याची आठवण लिहून ठेवली आहे. दुर्गाबाईं भागवत म्हणतात (कुठे ते आठवत नाही पण म्हणतात हे नक्की) “सूर्याच्या आगीत भाजून निघालेला पण अंगावर फ़ुलपाखरांप्रमाणे भरगच्च सौंदर्यचिन्हे- रुपाची, नादाची व सुगंधाची- धारण करणारा, चैत्रसखा वैशाख.” या पेटलेल्या वैशाख वणव्यात आम्हाला वेध लागले होते ते भोरगिरी वरून खांडस ला उतरायचे. असे उरफाटे बेत तडीला न्यायला लोकही तशीच उरफाटी लागतात. प्राथमिक बेत ठरला तेव्हा ब्रीदवाक्य एकाच होता ते म्हणजे रणरणत्या उन्हात भरपूर चालायचा आहे, दोन दिवसच सामान खांदयावर असेल तेव्हा तयारी ठेवा !! आधीच मानसिक तयारी केली कि मग शरीर दगा देत नाही. 14 ला पहाटे आम्ही एकदाचे प्रस्थान केले. पुण्यावरून राजगुरुनगरमार्गे भोरगिरीला जाण्यासाठी बस बदलावी लागते. राजगुरुनगर ते भोरगिरी हे अंतर सुमारे 60 किमी आहे, हि एसटी वाडामार्गे जाते रस्त्यात चासकमान धरण दिसते. पहिल्या बाजीराव पेशव्याची हि सासुरवाडी, इथल्या जोश्यांची मुलगी (काशीबाई) पेशवीण झाली. प्रवासाचे भौगोलिक ऐतिहासिक आणि पर्यावरणीय संदर्भ माहिती असतील तर भटकंती आपसूकच डोळस होत जाते बाकी राजगडावर ट्रेकिंगला जाणारे पण राजगड आणि रायगडमधला फरक माहिती नसलेले महाभाग “त्रेक्कर” असतातच !!
भोरगिरी किल्ला अगदीच पिटुकला आहे पण देखणा आहे. गावाच्या मागे उभा असलेला हा किल्ला सर करायला जास्तीत जास्त अर्धा तास लागतो . गावातच पाठीवरचे पिट्टू ठेवून या किल्ल्याकडे मार्गस्थ व्हावे. किल्यावर दोन गुहा आहेत. इथे मुक्कामाची सुंदर सोय होते. या गुहेतुन उंचावर गेल्यामुळे भोवतालचे भीमाशंकरचे जंगल जाणवू लागते. डोंगराच्या पायथ्याशी पहुडलेली गर्द जंगले डोळ्यांना सुखवू लागतात.
भोरगिरीच्या किल्ल्यावरील थंडगार पाण्याची गुहेच्या प्रवेशद्वारातून टिपलेले सवंगड्यांचे प्रतिबिंब
या दोन गुहांपैकी एक गुहा अगदी समोरच आहे दुसरी थोडी मागच्या बाजूला आहे. या मागच्या गुहेत निसर्गाचे एक अद्भुत आश्चर्य दडलेला आहे. रणरणत्या उन्हात जेव्हा तुम्ही या गुहेत येता तेव्हा इथे असलेला पाण्याचे कुंड तुम्ही तहान तर भागवतेच मात्र इथे असलेल्या मंदिराच्या गर्भगृहात गुडघाभर पाणी पसरलेले आहे. अतिशय स्वच्छ ,नितळ, पारदर्शक आणि कमालीचे थंडगार पाणी आणि काळाशार अंधार !! गुहेमाधली सुखद शांतता गुढतेत भर घालते . या मूर्तीपर्यंत जायचे म्हणाला थंडगार पाण्यात पाय घालावेच लागतात.या पाण्यात पाय अलगद बुडवले की एक थंड लहर थेट मेंदूपर्यंत जाते. मेंदुमधला तापमान नियंत्रक क्षणभर गडबडतो. निसर्गाची हि किमया तुम्हाला थक्क करून सोडते !! क्षणभर विश्रांती घेऊन हा किल्ला उतरून पुन्हा गावात यावे. गुहेत तसेच गावामध्येसुद्धा पिण्याचे पाणी भरून घ्यावे आणि भीमाशंकरकडे मार्गस्थ व्हावे. गावात बिसलरी वगैरे मिळत नाही त्यामुळे bore चे पाणी पिण्याची तयारी असावी तसेच रस्त्यात पाण्याची सोय नसल्याने पाण्याचा साठ मुबलक असावा. भोरगिरीवरून भीमाशंकरला जाणारा रस्ता हा चुकण्याची शक्यता कमी आहे. पायवाट जरी असली तरी या वाटेल चकवा देणाऱ्या गुरवाटा फारश्या नाहीत त्यामुळे चकवा लागत नाही . मात्र मध्ये दोन डोंगर चढून जावे लागते तसेच मध्ये लागणाऱ्या पठारावर झाडी कमी असल्यामुळे उन्हाचा जबर तडाखा बसतो . या तळपत्या उन्हात भाजून घ्यायचीसुद्धा मजा असते. तुमची रापलेली कातडी बरंच काही बोलून जाते अर्थात ज्याचा त्यांना आकर्षण आहे त्यांनीच त्या वाटेल जावे !! 'फेअर अँड लव्हली' वाल्यानी स्वस्थ घरी बसावे.
भोरगिरी ते भीमाशंकरच्या पहिल्या टप्प्यातील गर्द वनराई, भर दुपारी 1 काढलेले छायाचित्र, जंगलात जिथे जागा मिळेल तिथे पहुडलेले साथीदार 
पहिला डोंगर पार केला कि मोठे पठार लागते . या पठारानंतर मात्र अगदीच घनदाट जंगल सुरु होते ते थेट तुम्हाला गुप्त भीमाशंकरपाशी नेऊन ठेवते .हा मधला घनदाट जंगलाचा पट्टा गूढ आहे. घनदाट आहे गच्च झाडोरा आहे. सूर्यकिरणा जमिनीवर पोहचत नाहीत. असे हे जंगल किती सुंदर आहे हे पुन्हा शब्दात मांडायचे म्हणजे एक दिव्य !! साठ- सत्तर फुटांची झाडे , कवेत ना मावणारी खोडे आणि त्याला विळखा घातलेल्या वेली आणि त्यांची जाळी तुम्हाला पायवाट सोडून आत घुसुच देत नाही !! नुकताच वाळवाचा पाऊस पडून गेल्यामुळे हिरव्या पानांचा खच या रानवाटेवर पडला होता त्यामुळे सगळा आसमंत नखशिखांत हिरवाच !! हिरवा रंगाच्या छटाही अगणित !! जमीनही हिरवी दिसत होती. मातीचा वेडावणारा सुगंध रानातल्या उग्र वासबरोबर मिसळला होता ! या वाटेवर उन्मळून पडलेल्या झाडांनी सुंदर कमानी केल्या होत्या. इथे वाटही सपाटीची असल्यामुळे छातीचा भात शांत होता. श्वासोच्याश्वास स्थिर होता. आसमंतातील तो अनामिक सुगंध आम्ही छातीत भरून घेत होतो. सूर्य कलायला लागला होता त्याची तिरपी किरणं त्या पायवाटेवर मंद पसरली होती ! हिरवा, केशरी पिवळसर असा प्रकाश सर्वत्र पसरला होता , सकाळपासून चालत आल्यामुळे तोंडही बंद होती. साहजिकच आमचे सर्व डोंगऱयात्री संथावले होते सदस्यांमध्ये अंतर पडले होते.

शेकरुंचे थेट दर्शन ट्रेक यशस्वी ठरल्याची पावती होती. एक नाही तर दोन दोन शेकरू एकदम दिसले आणि चक्क फोटो काढेपर्यंत एकाच ठिकाणी थांबले. 
इतक्यात आमच्यातल्या आघाडीच्या साथीदारांना शेकरूंचे दर्शन झाले. एक नाही चार चार भीमाशंकर खारी त्यांना सहज स्पॉट झाल्या. दुर्दैवाने ग्रुप मधले आम्ही तीनही (स्वयंघोषित) फोटोग्राफर मागे रेंगाळलो होतो त्यामुळे आमची हि संधी हुकली. आळशीपणाला कोसत जास्त वाईट वाटत होते शेकरू आम्हाला न दिसण्यापेक्षा ते आमच्या मित्रांना दिसल्याचे !!
निसर्गाने लावलेल्या या सेट मध्ये आम्ही मनसोक्त फोटो काढले आणि पुन्हा निघालो !! हि वाट भीमाशंकरहुन गुप्त भीमाशंकर ला जाणाऱ्या वाटेला येऊन मिळते आता तिथेच तसा फलकच लावल्याने चुकण्याची शक्यता नाहीच. इथून डावीकडे वळले कि एक 20 मिनिटात तुम्ही गुप्त भीमाशंकर ला पोहचता. उजवीकडे वळलात कि भिमाशंकरच्या मंदिरामागे तुम्ही पोहचता. आम्ही गुप्त भीमाशंकर ला जाताना याच नाक्यावर आम्ही आमचे पिट्टू उतरवले आणि लगेच येऊ म्हणून एकत्र करून ठेवले. तेव्हा आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे याची कल्पना आम्हाला नव्हती !!
गुप्त भीमाशंकर आम्ही पोहोचताना आम्हा ‘फोटोग्राफर’ला देखील भीमाशंकर खारींनी दर्शन दिले आम्ही धन्य झालो त्यांना कॅमेरात बंदिस्त केले आणि आमच्या रुकसॅक ठेवल्या होत्या तिथे आलो . इथे एक वेगळाच कहर झाला होता सुमारे शंभर एक माकडं आमच्या सॅकभोवती जमून त्यांनी मनसोक्त लयलूट चालवली होती. काही मिनिटांच्या आत त्यांनी एक खाण्याची पिशवी आणि पाण्याच्या काही बाटल्या पळवून आमचा भार हलका करण्यात हातभार लावला. आम्ही आणलेली चितळ्यांची बाकरवडी माकडांच्या हातात बघून चितळ्यांची लोकप्रियतेची खात्री पटली. इथून आम्ही भीमाशंकरच्या मंदिरात पोहचलो. अजून नागफणीचा कडा बघणं बाकी होतं. मंदिराच्या मागे गावातल्या पोरांचा क्रिकेटचा डाव रंगला होता. मंदिरातील भाविकांच्या नजरेत एक प्रकारची कौतुकमिश्रित उत्सुकता होती. हा कौतुक सोहळा आटपून आम्ही लगबगीने नागफणिकडे मार्गस्थ झालो. नागफणीचा कडा इथे लांबपर्यंत आडवा पसरलेला आहे. मंदिराच्या मागूनच एक वाट इथे वर चढते. नागफणीवर उभे राहिले कि समोर सूर्यास्त दिसतो. उजव्या हातातला सिद्धगड दिसतो. डाव्या हाताला आधी पदरगड, त्याच्या मागे कोथळीगड आणि त्याच्याही मागे पार क्षितिजाला टेकलेले माथेरानच्या पठाराची सरळ आडवी रेघ !! खाली तीन टप्प्यात सह्याद्री सरळसोट तुटून कोकणपर्यंत पसरलेला आहे. पहिल्याच टप्प्यात अवघ्या 2 ,4 घरची पदरवाडी दिसते. त्याच्या खाली पुन्हा दोन कडे उतरले कि लागते ते कोकण !! तिथे बसलेली खांडस, नांदगाव, काटेवाडी अशी गाव फार सुरेख दिसतात.
दिवसभर केलेली पायपीट इथला मावळता दिनकर सार्थकी लावतो !! इथला भन्नाट वाहणारा वारा घामेजलेल्या अंगावर बसतो तेव्हा दिवसभराचा केव्हाच पळून जातो !!! इथे पहिल्या दिवसाची डोंगर यात्रा संपवून मुक्कामासाठी आम्ही फॉरेस्ट खात्याच्या विश्रामगृहात मुक्कामासाठी निघालो . आमची मुळातच अपेक्षा फक्त पथारी पसरण्यासाठी आवश्यक तेवढीच जागा हवी अशी असल्याने तेवढी जागा आम्हाला मिळाली .
दिवस सार्थकी लागला होता ,
सह्याद्री प्रसन्न होता ,
दुसऱ्या दिवसाची शिडीची वाट खुणावत होती,
शिडीच्या वाटेच्या थराराची कल्पना करत
दिवसातल्या अनुभवाची शिदोरी डोक्याशी घेत
डोंगऱयात्री निद्रिस्त झाले !!
क्रमशः ............



Comments

Popular posts from this blog

मेंगाईसोबतची रात्र

कासवांचे गाव

The Neighbour Side -- Visit to Pakistan High Commission