सिंगापूरची बिकट वाट वहिवाट
कॉफीचे पेले रिचवत, मन अजूनही त्याच दर्याखोर्यात रेंगाळत होते. गेल्या दोन दिवसात तुडवलेल्या रानवाटा, उतरलेल्या घाटवाटा, रायलिंग पठारावरची हळवी करून जाणारी संध्याकाळ, सिंगापूरच्या नाळेतील क्षणभर ठोका चुकवणारी घसरडी वाट, काळ नदीचे अद्भुत पात्र, वाळणडोहाचा चमत्कार, मोरे दाम्पत्याची आपुलकी , पाठीवर वाहिलेले जड पित्ठू, भरून आलेल्या पोटऱ्या , सिंगापुरातून मध्यरात्री पहिलेले काळेशार चांदणं........ पुढचे काही आठवडे तरी पुरणार होते...
![]() |
सिंगापूर गावात जाणारा रस्ता ज्याची सुरुवात भट्टी गावाच्या पुढील कुसारपेठ खिंडीतून होते. |
ते दिवस डोंगर भटकंतीच्या इव्हेंटचे झाले नव्हते. ट्रेकिंगचे सोहळे आणि सण झाले नव्हते. जेव्हापासून सिंगापुरचे नाव कानावर पडले तेव्हापासून त्याचे वेध लागले होते. सिंगापूरच्या आजबाजुला, इकडे तिकडे, जवळपास, खाली वर, मागे पुढे सगळी कडे पोहचता आले होते पण सिंगापूरपर्यंत पोहचता येत नव्हते. सिंगापूरची जागाच अशी अडचणीची अाहे. सह्याद्रीच्या अगदी गाभ्यात वसलेले हे बारकाले खेडे जगाच्या खिजगणतीतही नव्हते. आजही नाही.(?). सिंगापूरच्या मागे पसरलेले रायलिंगचे विस्तीर्ण पठार, मधली शे दोनशे फुटाची दरी अाणि दरी ओलांडली कि सह्याद्रीचे वैभव, रायगडाचा राखणदार बेलाग लिंगाणा आणि त्याच्या मागे दिसणारा दुर्गेश्वर रायगड !! हा सगळाच नजारा अप्रतिम !! आणि या सगळ्या पर्वतरांगाच्या जंजाळातून खाली उतरणार्या असंख्य घाटवाटा !! पार बोचुघोळच्या नाळेपासून ते मढे घाटापर्यंत या घाटवाटा म्हणजे सह्याद्रीच्या धमन्या जणू !
![]() |
देखणा हरणटोळ !!! |
देश आणि कोकण यांना जोडणाऱ्या या घाटवाटाची भ्रमंती म्हणजे एक सुखद अनुभव असतो. मात्र ही भ्रमंती करताना भटक्यांची त्यासाठी मजबूत तंगडतोड करण्याची तयारी हवी. सिंगापूरची नाळ हि अशीच एक नितांत सुंदर घाटवाट !! म्हणाल तर सोपी, म्हणाल तर दमवणारी !!!
सिंगापूरचा मोहीम ठरली तेव्हा सहा महिने आधी जाऊन या भागाची रेकी करून आलो होतो. तेव्हाच जाणवलं होतं की सिंगापूर गावात मुळात पोहोचणं हेच मुळात एक दिव्य आहे. मुळात ज्या गावात मुळात रस्ताच नाही तिथे एसटी नाहीच. त्या गावात पोहोचण्यासाठी चौदा ते पंधरा किलोमीटर ची पायपीट करावी लागते. अर्थात हे भटक्यांसाठी. ज्यांची अार्थिक कुवत अाहे ते थेट SUV सारखी वाहने घेऊन सिंगापुरात उतरू शकतात किंवा मोटा ग्रुप असेल तर वेल्ह्यातून तशी गाडी भाडे तत्वावर करता येते. तेवढा कच्चा रस्ता आता झाला आहे.
पुण्यातून सुरु झालेली आमची भटकंती रंग भरणार होती. कागदावरच गृहपाठ पक्का झाला होता. आता प्रात्यक्षिकाची वेळ होती. वेल्ह्याला पोहोचल्यानंतर यथेच्च चहा नाश्ता झाला. पोटाची खळगी मोठी असल्यामुळे वारंवार भरावी लागते. ती तुडुंब भरून घेतली आणि पुढच्या वाटेवर कुठली गाडी मिळते याची वाट बघत वेल्ह्यात थांबलो.
गाडी धुराळा उडवत निघुन गेली. समोर धुळीने भरलेला सिंगापूरचा रस्ता निपचीत पडून होता.उजव्या हाताला तोरण्याचा झंजारपासूुन ते बुधल्यापर्यंतचा विस्तार डोळ्यात मावत नव्हता. दुपारते बारा- साडेबारा झाले होते. पाठीवरचे पिठ्टू घट्ट केले अाणि सुरवात केली. काहीशे मीटर गेल्यानंतर डाव्या हाताला नाजूकशा हिरव्याशार हरणटोळाने दर्शन दिले अाणि हा ट्रेक बरंच काही दाखवणार याची खात्री पटली. हरणटोळचे मनसोक्त फोटो काढून झाल्यानंतर दोघंही अापपल्या वाटेला लागलो. डाेंगराच्या माथ्यावरुन बनवलेला हा रस्ता सरळ सिंगापुर अाणि मोहरी गावात जातो. या वाटेवर बिलकुल वस्ती नाही. मध्ये फक्त कुसारपेठ नावाचा धनगरांचा पाडा लागतो. कुसारपेठवरुन पुढे गेले की डोंगराला वळसा मारुन पुढे अालो की लिंगाण्याचे पहिल्यांदा दर्शन घडते. याच ठिकाणी एका डेरेदार झाडाखाली अाम्ही अामची न्याहरी उरकली. दुपारी साडेचारपर्यंत अाम्ही सिंगापूरच्या डोक्यावरच्या डोंगरापर्यंत पोहचलो होतो. खाली सिंगापूर गाव दिसायला लागले. इथून फुटणारा एक फाटा सरळ वर मोहरी गावात जातो. अामचा मुक्काम सिंगापुरात असल्यामुळे अाम्ही गावाची वाट पकडली.
येथे अाम्हाला घिसरहुन परतणाऱ्या मोरे काकू भेटल्या. त्यांना दाखवलेल्या शॉर्टकटमुळे अामचा शेवटचा दोेन अडीच किलोमीटर फेरा वाचला. सरळ डोंगरावरुन उतरणारी ही वाट थेट सिंगापुरात उतरत होती. या सत्तर अंशाचा उतारावरुन मोरे काकू डोक्यावरची बोचके अाणि कमरेवर माहेरून आणलेली कोंबडी घेऊन सरसर उतरत होत्या.
सिंगापुरात पोहचेपर्यंत पावणेपाच वाजले होते. जानेवारीचा महिना असल्यमुळे सुर्यास्ताला तास दीडतासच उरला होता त्यामुळे गावात पाठ टेकणे शक्य होणार नव्हते. त्यामुळे पाठपिशव्या मोरेंच्या घरातच सोडून अाम्ही रायलिंगच्या पठाराकडे उधळलो. झपझप पावले पडू लागली. सिंगापुरच्या गावाच्या मागून जाणारी वाट रायलिगं पठारावर उतरते. हे अंतर अंदाजे दोन सव्वा दोन किलोमीटरते असेल. वेळ कमी असल्याने अाम्ही अक्षरशः पळत पळत निघालो होतो. मध्ये दोन पट्टे जंगलाचे लागतात. इतक्या उंचीवर टिकून राहिलेले हे जंगलाचे सदाहरित पट्टे दुर्मिळ होत चालले अाहेत.
![]() |
रायलिंग पठारवरून दिसणारा लिंगाणा आणि रायगडामागे लपणारा सूर्य |
अाता लिंगाणा दर्शनाचे वेध लागले होते. वीस पंचवीस मिनीटांत पठाराच्या मागून हाताच्या बाजूने वर .येणारा लिंगाण्याच सुळका दिसला अाणि अाता सुर्यास्ताचा मुहुर्त चुकत नाही या भावनेने निर्धास्त झालो. रायलिंगच्या पठाराला निसर्गाने भरभरुन सौदर्यं दिले अाहे. अाम्ही रायलिंग पठारावर पोहचलो तेव्हा लिंगाणा या सोनसळी सुर्यप्रकाशात न्हाहुन निघाला होता. लिंगाणाच्या मागे उभा असलेल्या बलदंड रायगडाच्या डोक्यावर सुर्य पोहचला होता. लिंगाण्याचे सरळ सोट उभे ताशीव कडे धडकी भरवणारे होते. अाजमितीला या लिंगाण्याच्या टोक्यावर पोहचण्यासाठी कातळरोहणाचे साहित्य अावश्यक अाहे. या लिंगाण्याच्या पोटाशी गुहा अाहेत. तिथपर्यंत पोहचता येते. त्याच्या आधी लिंगाणामाची नावाचे अगदी छोटे गाव अाहे.
पुर्वी लिंगाण्याचा वापर कारगृह अाणि रायगडाच्या राखणदार किल्ला म्हणून केला जात असे. या किल्ल्याच्या माथ्यावर असणाऱ्या गुहेत कैद्यांना ठेवले जात असे अाणि खाली उतरणारे दोर काढून टाकले जात अशी माहिती सांगितली जाते.
जानेवारीचा महिना असल्याने पठारावर गवत बेसुमार वाढले होते. रायलिंगवरून लिंगण्याकडे जात असतानाच डावीकडची एक वाट बोराट्याच्या नाळेत उतरते.
ही ध़डकी भरवरणारी बोराट्याची नाळ उतरायला अवघड आहे. इथे दोर ना लावता उतरत येणं शक्य आहे पण त्यासाठी तुम्हाला सराव आवश्यक आहे. बोराटीच्या भेदक नाळेची वाट निम्म्यात उतरुन पाहीली अाणि माघारी घेऊन आम्ही रायलिंग पठारावर अस्तावस्त पसरलो. रायगडावरच्या जगदीश्वरामागे सूर्य लयास पावत होता. हे मनहारी अाणि दुर्मिळ दृश्य़ कॅमेरात टिपण्यासाठी सकाळपासुन केलेली पायपीट सार्थकी लागली होती. एक अमूर्त अनामिक समाधान मनात उतरले होते. काही सुंदर छायाचित्र गाठीशी जमा झाली. मावळत्या सूर्याच्या तप्तशार आणि लालभडक गोळ्याखाली जगडुश्वराचे मंदिर अशी एक दुर्मिळ आणि उकृष्ट फ्रेम मिळाली.
![]() |
जगदीश्वराचे मंदिर आणि मंदिराला टेकलेला मावळतीचा भास्कर |
सह्याद्रीच्या त्या अफाट नजऱ्यात हरवून जात , स्वतःचे अस्तित्व विसरून जात कुठल्याही कड्यावर बसून सूर्योदय किंवा सूर्यास्त पाहण्याचे भाग्य मिळणे हीच या सह्यसमाधीची अनुभूती असते. हळूहळू अंधार असा पसरत गेला आणि खालच्या कोकणातल्या गावातले दिवे लुकलुकू लागले. लिंगण्याच्या डावीकडे दापोली तर उजवीकडे पाने गाव आम्ही बसलेल्या जागेवरून दिसत होते. या गावामधून नागमोडी वळसा मारून पळणाऱ्या काळ नदीच्या पात्रातले पाणी चमचमत होते.
या फ्रेमसाठीचे कष्ट सार्थकी लागले होते. सह्याद्रीचा हा अनुभव खूप वेळ आलाय तुमची त्याच्या बिकट वाटांवरून फिरण्यासाठी जेवढे कष्ट घेता त्याचा पुरेपूर मोबदला तो तुमच्या पदरात टाकतो. कॅमेऱ्याचं ते सोपस्कार पार पडल्यावर आता वेळ होती ती "सह्य समाधीची".
दिवस मावळला होता, उद्या आम्हाला दापोलीला उतरायचे होते. अंधारातून आम्ही सिंगापूरला परतलो.
मोरे काकांच्या घरातच आमची आणि त्यांची अंगत पंगत झाली. मोरे कुटुबिंयाच्या अादरातिथ्याने ------ .
त्यांच्या घराशेजारीच असलेल्या स्वच्छ गोठ्यात आम्ही आमच्या पथाऱ्या पसरल्या. दुसरा दिवस खुणावत होता. त्याच्याच स्वप्नात रममाण होत कधी शालीत गुरफटलो पत्ताच लागला नाही.
![]() |
मोरे दाम्पत्य आणि अस्मादिक |
दुसरा दिवस उजाडला तोच गोठ्यातल्या जनावरांच्या हाकेने. भल्या पहाटे पोरांनो तुम्हाला नाळ उतरुन जाणे अाहे तरी लवकर उठा असा अावाज त्यांनी टाकला. मोरे काकांकडेच हक्काचा सकाळचा चहा झाला. मोरे काकांनी रात्रीच वाट दाखवायला यायचे कबूल केले होते. दिुलेल्या शबूतानुसार सकाळीच ते अावरुन तयार होते. कमरेला अडकवलेला कोयता. पायात कोल्हापुरी वहाण, गळ्यात पंचा , तंबाखुची चंची अाणि हातात काडतुस लावलेली दणकट काठी असा त्यांचा डोंगरी लवाजमा तयार होता. अामचे चहा पाणी होईपर्यंत काकंनी एक सुरेख बांबूची काठी अामच्यासाठी तयार करुन दिली. पुढे अोढ्यातल्या डोहाला पाणी मिळेल असे सांगून पाण्याचे कष्ट वाचवले.
सिंगापुरला जाणारी वाट सोपी जरी असली तरी पहिल्या टप्प्यात रायलिंग पठारावर ही वाट माहितगारशिवाय सापडणे अवघड अाहे कारण रायलिंग पठारावर असंख्य गुरवाटा पसरल्या अाहेत त्यात ही वाट हरवून जाते. त्यामुळे सुरवातीला ही वाट शोधणे गरजेचे अाहे. एकदा का वाट सापडली की मग चुकण्याची शक्यता कमी आहे. मोरे काकांमुळे हि वाट सापडणे अजिबात अवघड गेले नाही. जी वाट रायलिंग पठाराकडे जाते त्या वाटेला समांतर डावी वाट सिंगापूर गाव सोडला कि खाली उतरत जाते. सिंगापूर गाव सोडला कि पंधरा ते वीस मिनिटात हि वाट सुरु होते.
![]() |
वाटेवरचा कोरडा ओढा |
या वाटेने उतरले कि अर्ध्या पाउण तासाच्या चालीवर एक मोठा कोरडा ओढा आडवा लागतो . हि वाटेवरची खुण म्हणून लक्ष्यात ठेवावी. फेब्रुवारी अखेरपर्यंत या ओढातल्या डोहामध्ये पाणी असते. नंतर मात्र संपूर्ण वाटेवर कुठेही पाणी नाही.
पहाटे लवकर निघाल्यामुळे ओढ्यात छोटी विश्रांती घेण्यात आली. इथून दुर्गा दुर्गेश्वर रायगडचे बलदंड रूप नजरेस पडते. ओढ्याच्या मागच्या बाजूला आग्या नाळ खुणावत राहते. हा ओढा म्हणजे रायलिंग पठाराची बरोबर खालची बाजू. ओढ्यावर विश्रांती घेऊन झाल्यवर आता सुरु होतो तो सिंगापूरच्या नाळेचा सर्वात थरारक पट्टा.
![]() |
सिंगापूरच्या नाळेतील अवघड पट्टाची वाट , मागे दिसणारा रायगड |
ओढा पार केला कि सह्याद्रीचा माथा संपतो आणि उताराचा भाग सुरु होतो. या उताराची सुरुवातीची वाट हि डोंगराच्या कातळावरून काढण्यात आली आहे. हि वाट जीवघेणी जरी नसली तरी वाटेला दृष्टीभय नक्कीच आहे. त्यामुळे हा पट्टा काळजीपूर्वक पार करावा. चार पाच वळणे ओलांडली कि सिंगापूरच्या नाळेचा प्रत्यक्ष भाग सुरु होतो. सिंगापूरची नाळ हि लौकिक अर्थाने पाण्याच्या प्रवाहाच्या वाटेतून ना जाता डोंगराच्या उभ्या दाडावरून उतरवण्यात आली आहे. या वाटेवर पोहचला कि मागे रायलिंगचे पठार आणि लिंगाणा मागे उभा दिसतो.
![]() |
डाव्या हाताला लिंगाणा, मध्ये दिसणारी खिंड आणि उजव्या हाताला रायलिंगचे पठार, उजव्या हाताच्या खिंडीतून खाली उतरणारी बोराट्याची नाळ |
इथे आमची न्याहारी उरकली. मोरे काकांना इथे निरोप दिला. तोपर्यंत सूर्य डोक्यावर आला होता. मधल्या वाटेत फारशी गर्द झाडी नसल्यामुळे आता उन्हाचे चटके बसत होते. इथून वाट सरळ खालच्या दापोली गावात उतरते. मागे वळून बघितले तेव्हा लिंगाणा आणि त्याला चिकटून उतरणारी बोराट्याची नाळ मागे सरळ उठवली होती.
काळ नदीचे कोरडेठाक आणि काळ्याशार गोट्यांनी भरलेले हे पात्र हे या वाटेवरचे पुढचे आकर्षण होते. कदाचित या काळ्याशार खडकांनी भरलेल्या या नदीला 'काळ' नाव देखील या काळेभोरपणामुळेच मिळावे असावे. जानेवारीमध्ये कोरडीठाक पडलेली हि नदी पावसाळ्यात जेव्हा फुगत असेल तेव्हा तिचे ते रूप नक्कीच धडकी भरवणारे असेल.
म्हणता म्हणता आम्ही दापोली गावात पोहचलो. सिंगापूर गावातून निघाल्यापासून दापोली गावात पोहचायला चार साडे चार तास लागले होते. दापोलीत गेल्यानंतर गावातली लोक कुतूहलाने बघत होती. गावातल्या एका ओसरीवर क्षणभराच्या विश्रांतीसाठी थबकलो. घरातल्या माउलीने पाण्याची कळशी आणि गुळाचा खडा अगत्याने पुढे केला. इतक्या लांबून डोगर तुडवत कशा पायी येता ? हा परवलीचा प्रश्न होताच ज्याचा उत्तर आमच्याकडे नव्हताच.
![]() |
काळ नदीच्या खोऱ्यातून उठवलेला रायगड , एक वेगळे रायगड दर्शन !!! |
दापोली गावापासून सहा ते सात किलोमीटर असलेले हे ठिकाण म्हणजे स्थानिकांचे मोठे जागृत श्रद्धास्थान.
![]() |
डोहातले 'देवी'मासे !! |
इथे बारा महीने पाणी असणाऱ्या डोहाच्या बाजूला वरदायिनी देवीचे ठाण आहे. इथल्या डोहात हातभार लांबीचे कॅट फिश (शिंगाडा) आहेत. या माशांना देवीचे मासे ओळखले जात असल्याने त्यांना कोणी हात लावत नाही. या डोहात तुम्ही काहीही पदार्थ फेकला कि शेकडोच्या संख्येने हे मासे जमा होतात. इथेला पुजारी तर नुसता शीळ घालून या माश्यांना बोलावतो. क्षणार्धात त्या पाण्यात जिवंत होणारी हजारो माश्यांची खळबळ फार बघण्यासारखी असते.
![]() |
वरदायिनी देवीचे ठाणे |
![]() |
काळ नदीतले रांजणखळगे, मागे लिंगाणा, रायलिंग पठार आणि सिंगापूरची वाट, काळ नदीचे नितांत शांत सुंदर परिसर , सह्याद्रीचे सानिध्यात अस्मादिक |
भोर Stand ला पोहचलो तेव्हा संध्याकाळची कातर वेळ झाली होती. पुण्याला जाण्याची अजिबात इच्छया होत नव्हती. मन अजूनही त्याच दर्याखोर्यात रेंगाळत होते. गेल्या दोन दिवसात तुडवलेल्या रानवाटा, उतरलेल्या घाटवाटा, रायलिंग पठारावरची हळवी करून जाणारी संध्याकाळ, सिंगापूरच्या नाळेतील ठोका क्षणभर चुकवणारी घसरडी वाट, काळ नदीचे अद्भुत पात्र, वाळणडोहाचा चमत्कार, मोरे दाम्पत्याची आपुलकी , पाठीवर वाहिलेले जड पित्ठू, भरून आलेल्या पोटऱ्या , सिंगापुरातून मध्यरात्री पहिलेले काळेशार चांदणं पुढचे काही आठवडे तरी पुरणार होते...
हे सगळे क्षण, सह्याद्रीचे अद्भुत रुप सगळा मनात साचून राहिला आणि पुण्याकडे जाणार्या एसटीमध्ये अत्यंत जड पावलाने आम्ही मार्गस्थ झालो...... अर्थात पुन्हा परतण्यासाठी......
ट्रेकचा मार्ग
घाटाचे नाव - सिंगापूरची नाळ
देशावरील गाव - सिंगापूर
कोकणातील गाव - दापोली
-----------
अंतर
पुणे - वेल्हा - 65 किलोमीटर
वेल्हा - कुसारपेठ खिंड -14 किलोमीटर
कुसारपेठ खिंड - सिंगापुर - 10 किलोमीटर
सिंगापुर गाव - दापोली - 6 किलोमीटर
दापोली - वाळणडोह - 2 किलोमीटर
--------------------
सिंगापुर गाव - रायलिंग पठार - 3 किलोमीटर
रायलिंग पठार - सिंगापुर गाव - 3 किलोमीटर
---------------------
एकूण पायी भटकंती - 24 ते 26 किलोंमीटर अंदाजे
---------------------
mast.......thanks for sharing it!!!
ReplyDeleteअजित Thanks for reading !!
DeleteKhup Sundar, Thank you very much for sharing.
ReplyDeleteThanks shyam for reading my blog !!
ReplyDeleteYour feedback is always welcome for me.
सुरेख ट्रेक.. ओघवतं मस्त वर्णन..
ReplyDeleteअजून ट्रेक्स आणि ब्लॉग्जसाठी 'चालते' व्हा.. 👍👌☺️
साई दादा,
Deleteतुझी प्रतिक्रिया माझ्यासाठी फार महत्वाची आहे,
आपली आज्ञा शिरसावंद्य मानून चालते होणार.
रोहित छान!👍 घाटवाटा आनंद देणारया असतात.शारीरिक मानसिक परिक्षा जरुर बघतात पण त्रास विसरून आपण परत येतो.हे सह्याद्रीचे गारुड न संपणारे आहे! भटकत रहा! लिहीत रहा!👍
ReplyDeleteसह्याद्रीचे गारुड न संपणारे अाहे. हे खरं अाहे.
Deleteबहुमुल्य प्रतिक्रियेबद्दल धन्य़वाद दादा !!
सुंदर घाटवाटेचा & सह्याद्रीतल्या त्या विशिष्ठ परिसराचा एकंदर essence/अर्क ज्या प्रकारे लिखाणात उतरवलाय! भयंकर मजा आली वाचून! ���� ✌��
ReplyDeleteओघवत्या भाषेत, थरारक ट्रेकचा अनुभव. मस्त! >इतक्या लांबून डोगर तुडवत कशा पायी येता?< या प्रश्नाला उत्तर नसल्यामुळेच हे असं बेधुंद भटकणं आणि त्याच धुंदीत लिहिणं जमतं.
ReplyDeleteतुमच्या मर्मिक प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे काका !!
Deleteलोभ असू द्या !!
भारी रोहित सुंदर वर्णन वाचून च उत्साह आला अप्रतिम लेख आणि सह्याद्रीचे सौन्दर्य
ReplyDeleteHarshad,धन्यवाद प्रतिकियेबद्द्ल !!!
Deleteसह्यद्रीबद्दल बोलावे तितके थोडके !!
This comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete