 |
रतनगड ते हरिश्चंद्रगड ट्रेकचा भव्य पॅनोरमा , उजव्या हाताचा कलाडगड , मागे घनचक्कर-कात्राबाई-आजोबा पर्वतांची रांग |
सह्याद्रीच्या वाटा धुंडाळण्याचे हे वेड अंगवळणी पडत चाललंय. एकदा एखाद्या नवीन गडकोटाची, घाटवाटेची वारी घडली, की अजून नवनवीन वाटा गवसतात. मग या घाटवाटा खुणावू लागतात. मनात सतत रुंजी घालणाऱ्या या घाटवाटा, हे दुर्गसखे जोपर्यंत सर होत नाही तोपर्यंत ध्यानी,मनी तेच दिसू लागते. रतनगडावरून एक वाट कात्राबाईच्या खिंडीमार्गे मुळा नदीच्या स्वर्गीय खोऱ्यात उतरते आणि तिथून ती कलाडगडाला वळसा मारून थेट भटक्यांच्या पंढरीत हरिश्चंद्रगडला पोचते. खूप वर्षापूर्वी या भागात फिरताना या वाटेबद्दल ऐकले होते. या निमित्ताने नकाशावर ही वाट पाहिली होती, गुगलवरच्या फोटोमध्ये अनुभवली होती, पण प्रत्यक्षात या वाटेला आमचे पाय लागले नव्हते. यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर ते लागले. एक दणदणीत ट्रेक नावे लागला आणि कष्ट सार्थकी लागले.
 |
रतनगडाच्या पायथ्याचे अमृतेश्वर मंदिर |
 |
रतनगडाच्या पायथ्याचे मुक्कामाची उत्तम सोय असलेले मारुती मंदिर |
महिनाभरापासून या ट्रेकचा कट शिजत होता आणि तीन, चार दिवसाचा ट्रेक करायचा म्हणजे सर्वार्थाने तयारी करणे आवश्यक होते. बरोबर नेण्याच्या बारीकसारीक सामानापासून ते शारीरिक तंदुरुस्तीपर्यंत सगळ्याच गोष्टींची काळजी घेणे आवश्यक होते. ट्रेकच्या दिवशी सकाळी शिवाजीनगरहून सुटणाऱ्या सातच्या राजूर एसटीने आमचा मॅरेथॉन प्रवास सुरू झाला. ऑक्टोबर निम्मा संपला तरी पावसाळा संपला नव्हता. सॅक भरताना स्वेटर घ्यावा की रेनकोट याचा अंदाज येत नव्हता. आपल्या हवामान खात्याच्या अंदाजावर पूर्ण विश्वास ठेवून शेवटी स्वेटरच सॅकमध्ये कोंबला. राजूर, अकोला, कोतूळ या भागात जाणारी ही एकमेव एसटी पुण्याहून सुटते. त्यात दिवस दिवाळीचे असल्याने एसटी खच्चून भरली होती. ही गर्दी राजूरपर्यंत तशीच होती. सॅक, महागडा कॅमेरा, कॅरीमट हे सगळे समान गर्दीपासून सांभाळत सातची एसटी एक वाजता राजूरला दाखल झाली. राजूरपासून पुढे मिळेल त्या वाहनाने राजूर ते शेंडी, शेंडी ते रतनवाडी असा प्रवास करत अखेर सहाच्या सुमारास रतनवाडीला डेरेदाखल झालो.
शेवटच्या टप्प्यातल्या शेंडी ते रतनवाडी हा प्रवास पिक-अपच्या छतावर बसून झाल्याने अगदीच सुखाचा झाला. छतावरून दिसणारा सह्याद्रीच्या पॅनोरमा नजरेत मावत नव्हता. रतनवाडीला पाऊस आमच्या सोबतच पोचला. संध्याकाळची दाटून आलेला अंधार, शांत मुकी मुकी संध्याकाळ अाणि बरोबरीला कोसळणारा पाऊस अशा वेळी आम्ही गावात पोचलो. संध्याकाळपर्यंत रतनगडावर मुक्कामी जाण्याचा बेत ऐन वेळी पावसामुळे बदलावा लागला. संध्याकाळी अंधारात गड चढण्यापेक्षा सकाळी चढावा असा निर्णय घेतला आणि मुक्कामाची शोधाशोध सुरू झाली. गावातल्या एका झोपडीच्या वळचणीला उभे राहून पाऊस बघत असतानाच गावातली दोन चिल्लीपिल्ली पावसात रूम हवी का ? म्हणून विचारत आली.
रतनवाडीला याआधी येणे झाले होते. पण गेल्या काही वर्षात गावाचा संपुर्ण कायापालट झाला होता. टुरिझम नावाची गंगा गावात वाहू लागली होती. आत्ताच गाव प्रोफेशनल झाले होते. गावातल्या घरांमध्ये ओसरीवर अंग टाकायला जागा शिल्लक नव्हती, पण प्रत्येकाच्या परसदारात भाड्याच्या रूम मात्र रिकाम्या होती. शेवटी आपला हक्काच्या मारुती मंदिरात मुक्कामाची सोय झाली. रतनवाडीतले मारुतीचे मंदिर ही मुक्कामाची उत्तम जागा आहे. इथे विनामूल्य मुक्कामाची उत्तम सोय होते. दिवसभराच्या प्रवासामुळे एक अनामिक थकवा आला होता त्यामुळे मंदिरात पथारी पसरल्या पसरल्या कधी पांघरुणात उबदार झोप लागली पत्ताच लागला नाही.
बाहेर पाऊस, मल्हार आळवीत कोसळत होता.
---------------------
 |
रतनगडाचे प्रवेशद्वार |
दुसऱ्या दिवशी पहाट उजाडली तेव्हा गारठून टाकणाऱ्या थंडीने जाग आली. बरोबर आणलेल्या शालीत शरीर कोंबून थंडीपासून बचावाचा प्रयत्न चालूच होता; पण थंडी भागत नव्हती. रतनवाडीच्या मारुती मंदिराला खेटूनच भंडारदरा धरणाचा जलाशय पसरल्यामुळे हवेत भरपूर गारठा होता. मंदिराच्या डाव्या हाताला धुक्यात हरवलेला रतनगड दिसत होता. भल्या पहाटे आलेला एक ट्रेकर्सचा ग्रुप तिथेच बाजूला मुटकुळे करून पसरला होता. रतनगडाच्या पायथ्याला असलेले अमृतेश्वराचे मंदिर म्हणजे यादवकालीन स्थापत्यकलेचा एक अप्रतिम नमुना आहे. हे मंदिर सुमारे बाराशे वर्ष जुने आहे, असा इतिहास आहे. मंदिरासमोरची पुष्करणी आणि आजूबाजूचे विरगळ इतिहासाचा दाखला देत अनादी काळापासून येथे पडून आहेत. आजच्या दिवसात मोठा पल्ला गाठायचा होता. आदल्या दिवशी रतनवाडीत कात्राबाईच्या खिंडीतून जाणाऱ्या वाटेची चौकशी केली तेव्हा ती वाट टाळण्याच्या सल्ला गावकऱ्यांकडून मिळाला होता.
"वाट बुजत चालली" वाटेत जनावर फार' "पावसाळा संपलाय , रान लाई माजलय', "वाट गवसयाची नाय, बिबट फिरतंय वाटेत' असे अनेक सल्ले आम्ही गोळा केले होते. वाट्याड्याची चौकशी केली तेव्हा अडीच हजार रुपये होतील असे सांगण्यात आले. ट्रेकर्सचे जथ्थे घेऊन फिरणाऱ्या "टुरिस्ट ट्रेकर्स'चे हे दरपत्रक आमच्यासारख्या ट्रेकर्सना परवडणारेच नव्हते. त्यामुळे वाट्याडाचा बेत रद्दच करून टाकला. एकूणच कात्राबाईची वाट आपल्याला सापडणार का ? याबद्दल मन साशंक होते. आपण रस्ता शोधू शकू असा एक विश्वास होता. गृहपाठ पक्का केला होता. सोबत नकाशे होते. याआधी ट्रेक ज्यांनी केले त्यांच्याकडून वाटेची सविस्तर माहिती घेतली होती. या जिवावर आपण वाट शोधू शकू अशी खात्री होती, आणि मुळात या अनगड वाटांची आणि ट्रेक्सची खरी मजा ही यातच आहे. वाटाड्या घेऊन त्याच्या मागे मेंढरासारखे जाण्यापेक्षा आपण त्या परिसराचा अभ्यास करून नवीन वाटा धुंडाळण्यात एक वेगळी मजा असते.
 |
रतनगडावरील खडकातील कोरीव गुहा |
रतनवाडीतून रतनगडाकडे जाणाऱ्या दोन वाटा आहेत. एक वाट त्र्यंबक दरवाजातून साम्रद गावातून वर चढते ती रतनगड आणि शेजारच्या खुटा यांच्यामधून वर चढते. सांधण दरीच्या बाजूने येणारे ट्रेकर्स या बाजूने गडावर येतात. दुसरी वाट रतनवाडीतून येते. या वाटेला "शिडीची वाट' म्हणतात. येथे शेवटच्या पट्ट्यात दोन शिड्या लावल्या आहेत. ही वाट गणेश दरवाजातून गडावर पोचते. आम्ही शिडीची वाट निवडली आणि रतनगडावर पोचलो. प्रवरा नदीचा उगम रतनगडावर होतो. या वाटेने आपण दोन अडीच तासात रतनगडावर पोचतो. रतनगडाच्या किल्ल्याखाली पायथ्याला एक छोटा चौक लागतो. या चौकात साम्रदकडून येणारी वाट, रतनवाडीतून येणारी वाट एक होतात. रतनगडातून गणेश दरवाजाने उतरले, की उजव्या हाताची वाट सरळ कात्राबाईच्या जंगलात जाते आणि डावीकडची दुसरी वाट पुन्हा रतनवाडीला उतरते.
 |
कात्राबाईच्या मार्गावर, दाट जंगलातील पुसत चालेलेली पायवाट |
अठराव्या शतकात इंग्रजांनी घाटघर ते पाचनई ही वाट बांधून वापरात आणण्याचा प्रयत्न केला. हीच ती इंग्रजकालीन वाट ! या वाटेवर इंग्रजांनी लावलेले मैलाचे दगड अजूनही तग धरून आहेत. रतनगड किल्ला बघून आम्ही पुन्हा या चौकात परतलो. तेव्हा पावसाने जोर धरला होता. सकाळी आठ वाजता रतनवाडीतून निघून किल्ला सर करून पुन्हा या चौकापाशी उतरायला बारा वाजले होते. अजून कात्राबाईची खिंड चढून खाली उतरून पलीकडच्या कुमशेत गावात मुक्कामाला जायचे होते. सहा सात तासाची पायपीट बाकी होती. वेळेची गणितं चुकायला लागली होती त्यामुळे एक अनामिक दडपण आले होते. इथून पुढचा प्रवास हा केवळ आधी केलेल्या गृहपाठावर होणार होता. आम्ही वाट पकडली आणि चालायला लागलो.
 |
धुक्यात हरवलेला अग्नीबाणाचा सुळका, कात्राबाईच्या मार्गावर हा सुळका खुण म्हणून महत्वाची भूमिका बजावतो |
कात्राबाईच्या वाटेवर पंधरा मिनिटाच्या चालीवर दोन पाण्याची टाकी लागतात. वाट बरोबर असल्याची ती खूण असते. रतनगड हळूहळू मागे पडू लागला होता. पावसाळा नुकताच संपल्याने वाटेत उदंड गवत माजले होते. या गवतात पायवाटा पूर्ण झाकून गेल्या होत्या. वाटेत खुणेचे दगड नव्हते किंवा खडूने खुणाही केलेल्या नव्हत्या. माणसांचा वावर या वाटेवर बिलकूलच नव्हता. रानडुकरांनी केलेली "उकरण' बऱ्याच ठिकाणी दिसत होती. डोक्यावर रान गच्च होते त्यातून लांबवर उजव्या हाताला "अग्निबाण' नावाचा सुळका दिसत होता. याच अग्निबाणाला वळसा मारून पुढे कात्राबाईच्या खिंडीच जायचे होते. डोंगराच्या पोटात समांतर जाणारी वाट धरून आम्ही सुळक्याला वळसा घालून पुढे आलो. आता अग्निबाण सुळका मागे पडला होता. इथून पुढे एक वाट डावीकडे रानात शिरली होती. कात्राबाईच्या वाटेवर जो चकव्याचा फाटा लागतो तो हाच होता. ही वाट पुन्हा फिरून रतनवाडीला उतरते. आम्ही उजवीकडची वाट पकडली. या वाटेवरचा ट्रेकर्सना हमखास चकवणारा फाटा आम्ही अचूक हेरला होता आणि टाळलाही होता. अग्निबाण सुळक्याला वळसा मारली, की पंधरा वीस मिनिटात हा फाटा लागतो. अग्निबाण सुळका ही खूण म्हणून लक्षात ठेवावा; आणि उजवीकडची वाट सोडू नये. इथून पुढे वाट चढणीला लागली. सह्याद्रीच्या खूप आतल्या आणि दुर्गम पट्ट्यात आपण फिरत आहोत हे सतत जाणवत होते. शेवटी चढ संपला तिथे सरळ एक वाट खिंडीत जात होती. हीच ती कात्राबाईची खिंड ! या खिंडीत वरच्या बाजूला कात्राबाईचे ठाणं आहे. येणारे जाणारे भाविक याला नमस्कार करून क्षणभर विसावून मगच पुढे जातात.
 |
कात्राबाईचे ठाणे |
 |
कात्राबाईच्या खिंडीतून दिसणारा अग्निबाण सुळका |
रतनगडाचा चौक सोडल्यानंतर दोन तासांच्या सलग चालीनंतर आम्ही खिंडीत पोचलो. खिंडीतला वारा भन्नाट होता. पाठीवरच्या जडसर सॅक उतरवून पाठ टेकवली. समोर कुमशेतचा कोंबडा, मागे कलाडगड आणि हरिश्चंद्रगडापर्यंतचा विस्तृत कॅनव्हास दिसत होता. कुमशेतचा कोंबडा हा वैशिष्टपुर्ण सुळका लक्ष वेधून घेत होता. इथून खाली उतरणारी वाट पावसामुळे प्रचंड निसरडी झाली होती. गुडघ्यांवर प्रचंड ताण येत होता. हाताशी आधाराला धरायला फक्त वाटेवरचे गवत होते. अशी ती वाट जीव मुठीत धरून उतरलो. कुमशेतला पोचलो तेव्हा अंधार पडला होता. गावातल्या शाळेच्या पडवीत उत्तम मुक्कामाची सोय झाली. दुसरा दिवस यशस्वीरीत्या पार पडला होता. कात्राबाईच्या कृपेने कुठेही वाट न चुकता, रानात न हरवता आम्ही सुखरूप मुक्कामी पोचलो होतो. दिवसभराचा प्रवास आठवत, कॅरीमॅट पसरून निद्राधीन झालो.
 |
कुमशेतची शाळा, गावात इथे मुक्कामाची उत्तम सोय होते |
--------------------------------
 |
डोंगराच्या पायथ्याशी पहुडलेले कुमशेतचे देखणे खेडेगाव |
तिसरा दिवस उजाडला तो डोंगराच्या कुशीत ! समोर "कुमशेतच्या कोंबडा' देखणा दिसत होता. आजच्या दिवसात भरपूर पायपीट करायची होती हे नक्की होते. संध्याकाळी मुक्कामाला थेट हरिश्चंद्र गाठायचा होता. दिवसाच्या वेळापत्रकाची उजळणी करत सामान आवरले. चहापाणी करून कुमशेत सोडले तेव्हा सकाळचे साडेआठ वाजले होते. इथून पुढची वाटचाल ही सह्याद्रीच्या खूप आतल्या भागातून होणार होती. कुमशेत सोडल्यानंतर शेतपठारांमधून जाणारी गवतामधली वाट मळलेली होती. हीच वाट इंग्रजांनी शे-दोनशे वर्षापूर्वी वापरात आणली होती. पाचनई- घाटघरचे अंतर दाखवणारे मैलाचे दगड वाटेत होते. ज्या भागात आपल्या सरकारचे रस्ते अद्याप पोचलेले नाहीत त्या भागात शंभर एक वर्षांपूर्वी रस्ता बांधण्याचा घाट घालणारे इंग्रजांचे याबाबतीत खरंच कौतुक करायला हवे.
 |
इंग्रजांनी बांधलेल्या साम्रद-पाचनई मार्गावरील मैलाचे इंग्रजकालीन दगड, दगडावर पाचनई आणि साम्रद गावांचा स्पष्ट उल्लेख दिसतो. |
कुमशेतवरुन जाणारी ही वाट मुळा नदीच्या खोऱ्यात उतरते. मुळा नदीच्या खोऱ्याचा हा भाग म्हणजे सह्याद्रीच्या सौदर्यं दाखवणाऱ्या काही मोजक्या जागा शिल्लक आहेत त्यांपैकी एक ! हिरव्यागार आणि घनदाट अशा जंगलाच्या पट्ट्यातून नागमोडी वळणे घेत, दोन्ही बाजूच्या कातळाला चिरत जाणारी मुळा नदी म्हणजे सळसळत जाणारी नागीण जणू ! मुळा खोऱ्याचा हा पट्टा अद्याप मानवी हस्तक्षेपासून बऱ्यापैकी दूर आहे. रतनगड आणि हरिश्चंद्रगडाच्या मधल्या बेचक्यात, अत्यंत दुर्गम भागात असलेला नितांत रमणीय परिसर आहे. या भागापर्यंत पोचण्यासाठी कष्ट फार, मानवी वस्ती कमी, रस्ते नाहीत त्यामुळे निसर्गाची मनोवेधक रूपं ही बघायला मिळतात. पश्चिम घाटाची जैवविविधता येथे मोठ्या प्रमाणात अभ्यासायला मिळते. मुळेच्या काठावर उतरल्यावर मनसोक्त पोहणे झाले. मुळा नदीचे इथले वाहते पात्र, स्वच्छ खळाळते पाणी, इथली शांतता, स्वच्छता, इथला निसर्ग, दोन्ही बाजूला पहारेकऱ्यासारखे सह्याद्रीचे उभे ठाकलेले कडे, आजूबाजूचा निबिड वनराईचा पट्टा हे सगळं सगळं उरात साठवून घेतला. इथून बिलकूल हलावसं वाटत नव्हतं पण वेळेच्या मर्यादा होत्या. आम्ही जो तास-दोन तास या नदीकाठी घालवला त्या काळात इथली शांतता कायम लक्षात राहील.
 |
मुळा खोऱ्याचा स्वर्गीय परिसर |
साडेआठला कुमशेत सोडल्यानंतर आम्ही दीड तासात मुळाकाठी पोचलो होतो. नदीच्या काठी आम्ही न्याहारी उरकली. नदीकाठच्या झाडाखाली डुलकीही झाली. या सगळ्यात दोन तास सहज मोडले. निघायला बारा-साडेबारा वाजले. पाण्याचा अंदाज घेऊन आम्ही नदी ओलांडली, पण या नादात रस्ता चुकून आम्ही पेठेच्या वाडी ऐवजी कलकिन वाडीवर पोचलो. आठ दहा घरांच्या वाडीत गेल्यावर आपण चुकलो असं कळलं, तेव्हा एका आज्जीबाईने इयत्ता तिसरी आणि पाचवी मधल्या दोन मुलांना आम्हाला वाट दाखवायला पाठवले. पायात चप्पलसुद्धा न घातलेली ती पोरं सरसर चालत, कमरेइतक्या पाण्यातून नदी पार करत, समोरचा खडा डोंगर चढून अर्ध्या तासात आम्हाला पेठेच्या वाडीत बिनचूक घेऊन गेली. पेठेच्या वाडीत पोचलो तेव्हा घड्याळ्याचा काटा दोनावर स्थिरावला होता. अजून सहा-सात किलोमीटर अंतरावरचे पाचनई गाठून पुन्हा हरिश्चंद्रगडाचा माथा गाठायचा होता. पेठेच्या वाडीत फक्त पाणी भरून घेत आम्ही वेळ न दवडता पुढच्या वाटेला लागलो. पेठेची वाडी ते पाचनईचा रस्ता बैलगाडी जाईल इतक्या चांगल्या अवस्थेत आहे. कलाडगडला जाण्यासाठी वाटसुद्धा याच रस्तावर आहे. पेठेच्या वाडीतून निघाले, की आपण कलाडगडाला पूर्ण अर्धगोलाकार वळसा मारून पुढे जातो आणि हरिश्चंद्रगड सामोरा येतो. कलाडगडाच्या मागे दिसणारे न्हापता शिखर खुणावत होते. पेठेच्या वाडीतून पाचनईला पोचेपर्यंत हरिश्चंद्रगडाचे वेगळे रूप आपल्याला दिसते. हरिश्चंद्रगडाची व्याप्ती आणि रौद्ररूप या वाटेवरून जाताना जास्त ठळकपणे जाणवते.
 |
पेठेची वाडी - पाचनई मार्गावरील अजस्त्र कलाडगड, या गडाला पूर्ण वळसा मारून पुढे मार्गस्थ व्हावे लागते. |
पेठेच्या वाडीतून निघाल्यानंतर पाऊणे तीन तासात(पाच वाजता) आम्ही पाचनईला पोचलो. गावात जेवणाची सोय होते. तेव्हा जेवण करून सहा वाजता आम्ही हरिश्चंद्राची वाट चढू लागलो. वाट रुळलेली असल्यामुळे चुकण्याची शक्यता नव्हतीच. गडावर पोचायला आठ वाजले. नागेश्वराच्या गुहेत मुक्कामाची उत्तम सोय झाली. तिथे तीन दगडांची चुली लावून सरपण घालून गरमागरम सुप बनवले. बाहेर सुरेख चांदणे पडले होते. दोन दिवसापुर्वीचा पाऊस पूर्ण नाहीसा झाला होता. हरिश्चंद्रगडावरच्या पुष्करणीच्या पायऱ्यांवर बसून सुपाचा आस्वाद घेत, पडलेली थंडी अनुभवत , सभोवतालच्या अंधारात आम्ही बुडून गेलो, भटक्यांची कायम गर्दी असणारा हा गड आज मात्र निर्मनुष्य होता. गडावर बरीच नवी खोपटीवजा हॉटेले उभी राहिली होती. तिथले गावकरी आज गडावर नव्हते. गुहेत राहायला आलेला साधू ध्यान लावून बसला होता. हे सगळ्यांमध्ये हरिश्चंद्राशी गुज साधत पांघरुणात गुरफटलो.
-------------------------------
 |
कोकणकडा |
शेवटच्या दिवशी सकाळीच रिवाजाप्रमाणे कोकणकड्यावर जाऊन बसलो. गेल्या चार दिवसात सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर बागडतानाचे असंख्य क्षण इथल्या नीरव शांततेत समोर उभे ठाकले. एखाद्या चित्रपटातल्या दृश्याप्रमाणे सगळ्या गोष्टी दिसत होत्या. एका भन्नाट ट्रेक संपत आला होता. सह्याद्रीचा निरोप घेण्याची वेळ आली होती. अशा वेळी वाटणारी एक अनामिक हुरहूर दाटून आली होती. कोकणकड्यावरुन माघारी येऊन आम्ही मंदिरात आलो. सॅक आवरून खिरेश्वरच्या वाटेला लागलो. रतनवाडीला सुरू केलेली पदयात्रा आता खिरेश्वरला संपत होती. टोलार खिंडीतून उतरून खिरेश्वरला पोचलो, तेव्हा एसटीचा संप सुरू होता असे कळले. चार दिवस रानावनात- डोंगरदऱ्यात असल्यामुळे या संपाची काहीच खबरबात नव्हती. शहरी जीवनात पुर्नप्रवेश झाला होता.
आठवणींच्या गाठोड्याने खांद्यावरची सॅक जड झाली होती आणि पाऊलं मंदावली होती.
--------------------------------------------------------------------------------------------
ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित आहेत. लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय हे कुठही प्रकाशित किवा प्रसिद्ध करू नये.
--------------------------------------------------------------------------------------------
|
एक नंबर...छान, नियोजित आणि नविन मार्ग धुंडाळलात. आणि मुळामध्ये आम्हाला उपयोगी पडेल ती सगळी माहिती व्यवस्थितरीत्या आपल्या बाॅल्गमध्ये मांडलीत. सह्याद्रीची भुरळ तर ज्यांना सह्याद्री समजली त्यांना शांत बसू देतच नाही. आणि नविन वाटा शोधल्याशिवाय आपल मन थार्यावर राहत नाही. खरच भारी वाचून मस्त वाटल आणि अशी आडवाटेवरचे ट्रेक असतील तर शक्य असेल तर कल्पना द्यावी आपल्यासोबत ट्रेक करायला आवडेल.
ReplyDeleteआपल्या बहुमूल्य आणि वेळ काढून लिहिलेल्या प्रतिकियेबद्दल मनापासून आभारी आहे,
Deleteआपण फेसबूकवर असल्यास मित्र यादीत यावे जेणेकरून ट्रेक ची कल्पना देता येईल.
Sunder lekh ani mahiti
ReplyDeleteThabks harshada for reading and your comment
DeleteAmazing photographs! Informative writing!
ReplyDeleteThanks sujit
ReplyDeleteKillas ede
ReplyDelete