तापोळ्याच्या रानवाटांवर

तापोळय्च्या जलाशयातून आजूबाजूच्या गावात मोठ्या प्रमाणात जलवाहतूक चालते तिथले दळणवळणाचे मुख्य साधन होद्याच आहे


 सह्याद्रीच्या रानवाटांवर फिरण्यासाठी हिवाळ्यासारखा ऋतू नाही. ऋतूमानानुसार बदलणारी सह्याद्रीची रूपं बघण्यासाठी प्रत्येकाने सह्याद्रीची शिखरे सर करायलाच हवीत, डोंगरमाथे गाठायलाच हवेत अशी सक्ती नाही, कोयना-जावळीच्या घनदाट अरण्यातल्या रानवाटांवर पहाटेच्या वेळी केलेला एखादा वॉक किंवा शिवसागर जलाशयाच्या निळ्याशार पाण्यात केलेली जलभ्रमंती तुम्हाला सह्याद्रीच्या गूढतेची नक्कीच अनुभूती देऊन जाते. कोयनाकाठी वसलेल्या अशाच एका भ्रमंतीविषयी... -------- .

कोयनेच्या खोऱ्याचे "पॅनोरमिक' दर्शन 




महाराष्ट्राला लाभलेल्या निसर्गाच्या अद्‌भुत वरदानांपैकी एक म्हणजे महाबळेश्‍वर ! पावसाळ्यात धो धो कोसळणारा पाऊस पिऊन इथली वनराजी तट्ट फुगते आणि वर्षभर पुरेल इतकी हिरवळ घेऊन महाबळेश्‍वरच्या पठारावर पसरते. हिवाळ्यामध्ये महाबळेश्‍वरच्या या हिरव्याकंच रानवाटा कोणालाही भूल पाडतील अशाच असतात. महाबळेश्‍वरचे निसर्गरम्य कडे, आर्थर सीट पाईट, शंकराचे मंदिर, प्रतापगड, पाचगणीचे पठार, कृष्णेचे उगमस्थान ही सर्व स्थाने प्रेक्षणीय आहेत. मात्र, आजकाल इथे होणाऱ्या गर्दीमुळे महाबळेश्‍वरचा श्‍वास हळूहळू कोंडू लागला आहे. या गर्दीमुळे इथली नीरव शांतता कुठेतरी हरवत चालली आहे असे जाणवते. गर्दी गोंगाटापासून लांब आणि शांततेच्या शोधात जर तुम्ही असाल तर महाबळेश्‍वरजवळ असलेले "मिनी काश्‍मीर' अर्थातच तापोळ्याल्या तुम्ही भेट द्यायलाच हवी. 
                               तापोळा-महाबळेश्‍वर अंतर अवघे तीस किलोमीटर आहे. रस्ता अर्थातच छोटा पण डांबरी आहे. महाबळेश्‍वरला पाच नद्यांचा उगम होतो. त्यातल्या कोयना नदीवर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे धरण बांधण्यात आले. जावळीच्या खोऱ्यात पसरलेल्या या आक्राळविक्राळ जलाशयाचे नामकरण "शिवसागर' असे करण्यात आले आहे. सह्याद्रीच्या अजस्र रांगा आणि त्यामध्ये पसरलेला हा अवाढव्य जलाशय आणि पर्वतरांगांच्या मध्ये पसरलेला सदाहरित जंगलाचा विस्तृत पट्टा या प्रदेशाची दुर्गमता वाढवतो. तापोळा म्हणजे या जलाशयाच्या काठावर असलेला एक छोटासा बिंदू. कोयना धरणाच्या बांधकामाची सुरवात 1956 या वर्षी झाल्यानंतर 1963 पासून या धरणात पाणी भरायला सुरवात झाली. तेव्हा कोयनेच्या खोऱ्यातील अनेक गावे उठली आणि शिवसागर जलाशयाच्या काठावर वसली. तापोळा, बामणोली, वासोटा ही त्यातलीच काही गावे आज पर्यटनाच्या जिवावर तग धरून आहेत. कास पठारामुळे बामणोली प्रसिद्ध झाले. वासोटासारखा भन्नाट वनदुर्ग आधीपासूनच भटक्‍यांमध्ये प्रसिद्ध होता. आता हळूहळू पर्यटकांचे लक्ष तापोळ्याकडे जात आहे. समुद्रासारखा अथांग पसरलेला कोयनेचा जलाशय, थंड व आल्हाददायक हवामान, आजूबाजूची गर्द वनराजी यामुळे तापोळ्याची वैशिष्टे आहेत. महाबळेश्‍वरच्या श्रीमंत पर्यटकांची नजर अजून इकडे वळली नसल्याने इथली नीरव शांततादेखील बऱ्याच अंशी टिकून आहे.    
तापोळ्याचा विस्तीर्ण जलाशय अाणि पाण्याखाली गेलेल्या बेटावरूल झाड 
     
                  महाबळेश्‍वरच्या मुख्य बाजारपेठेपासून तापोळ्याकडे जाणारा रस्ता खाली उतरतो. दोन्ही बाजूला गर्द झाडी असल्याने सुरवातीला रस्त्याला चिकटून धावणाऱ्या नदीचा आणि दरीचा अंदाज येत नाही. मात्र दहा किलोमीटर अंतर कापल्यानंतर घनदाट जंगलामधून धावणारा रस्ता संपून आपण डोंगरमाथ्यावर येतो आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेल्या कोयना धरणाच्या निळ्याशार पाण्याचे विहंगम दर्शन घडते. इथे डाव्या हाताला शिवसागर पॉइंट लिहिलेली एक पाटी दिसते. या ठिकाणावरून कोयनेच्या खोऱ्याचे "पॅनोरमिक' दर्शन घडते. या ठिकाणी घटकाभर टेकूनच पुढे जावे. छायाचित्रकारांसाठी हे ठिकाण म्हणजे पर्वणीच आहे. तापोळ्यात आज दोन बोट क्‍लब आहेत. उपजीविकेचे मुख्य साधन पर्यटन हेच असल्याने एका ओळीत नांगरलेल्या शेकडो बोटी तापोळ्यात गेल्या गेल्या लक्ष वेधून घेतात. तापोळ्यापाशी सोळशी नदी कोयनेला येऊन मिळते, त्यामुळे नद्यांच्या संगमाशेजारी तापोळा वसलेले आहे. तापोळ्याचे मुख्य आकर्षण आहे ती इथला जलविहाराची. तापोळ्यावरून जलविहारासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. स्पीड बोट, मोटर बोट, स्कूटर बोट असे पर्याय उपलब्ध आहेत. जर तुम्हाला निव्वळ जलक्रीडेपेक्षा आजूबाजूच्या सृष्टीसौंर्दयात रस असेल तर मोटार बोटीचा पर्याय योग्य ठरू शकतो. निळ्याशार पाण्यातून हळूहळू अंतर कापत जाणारी मोटार बोटीतून दोन्ही बाजूच्या जंगलाचे गूढ दर्शन तुम्हाला आपसूकच मंत्रमुग्ध करून सोडते. 
                                       तापोळ्यावरून एकूण तीन ते चार ठिकाणे बघण्यासारखी आहेत. तुमच्या हातात असलेला वेळ, तुमच्या ग्रुपमधील सदस्यसंख्या आणि तिकिटाचा दर याचा ताळमेळ घालून नियोजन करावे. आयलॅड दर्शन - तापोळ्यावरून निघणारी ही सफर सुमारे तासा दीड तासात संपते. तापोळ्यावरून सुमारे 45 मिनिटांच्या अंतरावर हे बेट आहे. या बेटावर जाता येते. बेटावर चहापाण्याची सोय होऊ शकते. पावसाळ्यानंतर हे बेट पाण्याखाली जाते तेव्हा बेटासमोर असणाऱ्या काठावर बोट थांबवली जाते. बारा लोकांच्या मोटारबोटसाठी सुमारे 900 ते 1000 रुपये शुल्क आकारले जाते. हे अंतर अंदाजे पाच ते सात किलोमीटरचे आहे. त्रिवेणी संगम - या जलसफरीसाठी अंदाजे दीड तास लागतो. कोयना, सोळशी आणि कंडकी या तीन नद्यांचा संगम जेथे होतो तिथे हा त्रिवेणी संगम आहे. या ठिकाणी जलाशयाचे पात्र सुमारे 300 फुटांहून खोल असल्याची माहिती स्थानिक नावाड्यांकडून दिली जाते. बामणोली व कास पठार - कोयना जलाशयाच्या दक्षिणेला बामणोली गाव वसलेले आहे. बामणोलीपासून अवघ्या वीस किलोमीटर जगप्रसिद्ध कासचे पठार आहे. कास पठाराचा शेजार आणि वासोटा या वनदुर्गाकडे जाणारा रस्ता याच ठिकाणाहून जात असल्याने हे ठिकाण डोंगरभटक्‍यांमध्ये प्रसिद्ध आहे. येथे जाण्यासाठी अंदाजे तासाभराचा कालावधी लागतो. बामणोली गावात स्वतंत्र बोट क्‍लब असल्याकारणाने तापोळ्यावरून बामणोलीला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी आहे. तापोळा ते बामणोली अशी जेटी सुविधासुद्धा उपलब्ध आहे. चारचाकी वाहनांची ने-आण या बोटीतून करता येते. 
                    याव्यतिरिक्त तापोळा ते बामणोली असा गाडीरस्तासुद्धा आहे. दुतर्फा गर्द झाडी असलेला हा रस्ता अत्यंत विलोभनीय आहे. जंगलप्रेमींनी या रस्त्यावर भल्या पहाटे फेरफटका मारल्यास सह्याद्रीच्या जंगल्यातल्या बऱ्याच वनचरांचे दर्शन या रस्त्यावर सहज घडते. वासोटा - तापोळ्यावरून बोटीने जाऊन बघण्यासारखे एक अफलातून ठिकाण म्हणजे दुर्ग वासोटा ! जावळीच्या किर्र अरण्यात वसलेल्या या दुर्गाला संरक्षण असेल तर इथल्या हिंस्र श्‍वापदांचे आणि उंच डोंगरकड्यांचे. तापोळ्यावरून वासोट्याला जाण्यासाठी सुमारे तीन तास लागतात. वासोट्याच्या काठावर उतरून पुन्हा जंगलात दीड दोन तास चालत हा किल्ला सर करावा लागतो. इथून दळणवळणाची सोय नसल्याने बोट दिवसभर थांबून राहते. या फेरीसाठी साडेतीन ते चार हजार रुपये घेतले जातात. 
                       कोयना धरण भिंत - कोयना धरणाची भिंत तापोळ्यापासून सुमारे नव्वद किलोमीटर लांब आहे. तापोळ्यावरून खास बोट करून येथपर्यंत जाण्याची सोय होऊ शकते. पूर्वी कोयनानगर येथे असलेल्या धरण्याच्या भिंतीपर्यंत नावाडी घेऊन जात असत. मात्र गेल्या काही वर्षांतील दहशतवादी हल्ल्यांमुळे आता धरण्याच्या भिंतीपर्यंत जाण्यास मनाई करण्यात आली आहे. हे अंतर बरेच जास्त असल्यामुळे या प्रवासासाठी शुल्क आकारणी जास्त केली जाते. (सीझननुसार पाच ते साडेपाच हजार). कोयना अभयारण्य - कोयनेचे जंगल हे महाराष्ट्रातील सर्वांत दुर्गम असे जंगल मानले जाते. सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि शिवसागर जलाशयाचा फुगवटा यामुळे इथला मानवी संचार कायम मर्यादित राहिला आहे. या भागातील गावे पाण्याखाली गेल्यामुळे उठली. 2007 मध्ये हाच भाग "सह्याद्री व्याघ्र प्रकल्प' म्हणून घोषित करण्यात आले. इथल्या वाघांच्या अस्तित्वाबद्दल जरी शंका असली तरी व्याघ्र प्रकल्पामुळे इथले जंगल संरक्षित घोषित करण्यात आले व उरलेल्या गावांचे पुनर्वसनाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तापोळ्याचा भाग हा याच प्रकल्पाच्या पट्ट्यात येत असल्याने तापोळ्याच्या परिसरात वन्य प्राण्यांचे दर्शन होऊ शकते. त्यामुळे रात्री-अपरात्री फिरताना काळजी बाळगावी. महाबळेश्‍वर हाकेच्या अंतरावर असल्याने तिथल्या शहरीकरणातची चिन्हे हळूहळू तापोळ्यातसुद्धा उमटू लागली आहेत. ऍग्रोटूरिझमसारखा स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणारा नवीन व्यवसाय इथे चांगलाच रुजत आहे. त्यामुळे तापोळ्यात आज जेवणाची व मुक्कामाची सोय नक्कीच होऊ शकते. मात्र तिथल्या सोयी सुविधांचा चौकशी आधी व्यवस्थित करावी. तापोळ्याला मुक्काम केल्यास वर दिलेली सर्व ठिकाणे व्यवस्थित पाहून होतात. तसेच पहाटेच्या आल्हाददायक वातावरणात बाजूच्या जंगलात फेरफटका मारण्याची मजा अनुभवायला मिळते. तापोळ्याला मुक्काम करणे ज्यांना शक्‍य नसेल त्यांच्यासाठी महाबळेश्‍वर हा निवासासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. महाबळेश्‍वरमध्ये निवासासाठी पुष्कळ हॉटेल उपलब्ध आहेत.

 अंतरे 
पुणे - महाबळेश्‍वर - 120 किमी 
मुंबई - महाबळेश्‍वर - (पोलादपूर मार्गे) - 230 किमी 
मुंबई - महाबळेश्‍वर - (पुणे मार्गे) - 265 किमी mi
सातारा - महाबळेश्‍वर - 60 किमी 
कोल्हापूर - महाबळेश्‍वर - 180 किमी 
महाबळेश्‍वर - तापोळा - 30 किमी
-----------------------------------------------------------------------
ता.क. तापोळा - महाबळेश्वर रस्त्यावरच अाम्हाला हरिण दिसले होते. अन्न साखळीतील एक महत्वाचा दुअा असलेले हरणाचे या जंगलातले अास्तिस्व बरेच काही सांगून जाते..  सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या अास्तिस्वावर मात्र अजूनही प्रश्नचिन्ह अाहेच.
----------------------------------------
सदर लेख सकाळ साप्ताहिकचा अंकात पर्यटन सदराखाली वर्ष २०१७ मध्ये प्रसिध्द झाला अाहे

Comments

Popular posts from this blog

मेंगाईसोबतची रात्र

कासवांचे गाव

The Neighbour Side -- Visit to Pakistan High Commission