भीमाशंकर ते खांडस (शिडीची वाट )

भीमाशंकरच्या घनदाट जंगलातली 'अरण्यकन्या'

'शिडीचा घाट' !! थरारक , चित्तथरारक , अवघड ,बिकट , रोमांचकारी असा काय काय विशेषण लावता येणारा हा घाट उतरायचा म्हणजे नजर उंचीला स्थिरावरलेली स्थिर हवी, पाय भक्कम हवेत आणि पोटाऱ्याच्या स्नायूंमध्ये ताकद हवी आत्मविश्वास हवा मात्र फाजील नसावा , माज तर बिलकुल नसावा, सह्याद्री उग्र आहे त्यामुळे इथे "चुकीला माफी नाही"उंची, पाणी असले कसले फोबिया असलेले शहरी मावळे इथे अगदीच कुचकामी !!


भीमाशंकर वरून खांडस ला उतरण्याच्या दोन प्राचीन घाटवाटा आहेत !! एक आहे गणपती घाटाची दुसरी शिडीच्या घाटाची . गणपती घाटाची वाट गणपती सारखीच तुंदिल तनू !! रमत गमत जाणारी हि वाट अगद सहज तुम्हाला खांडस ला आणून सोडते ना चुकण्याची शक्यता ना हरवण्याची . भरगच्च जंगलातून जाणारी हि वाट सुखावह आहे . या वाटेवर माणसांचा वावरही तुलनेने कमी असल्याने इथल्या शांततेत हे अरण्य बरंच काही बोलून जाते अर्थात तुमची ऐकण्याची इच्छा हवी .
8, 10
लोकांच्या कवेत मावणार नाहीत इतक्या मोठ्या खोडाची झाडे इथे जिवंत इतिहास घेऊन वर्षांनुवर्षे उभी आहेत . भीमाशंकर मंदिराच्या पायऱ्या जिथे सुरु होतात तिथे उजवीकडे जाणार रस्ता खाली खांडसला उतरतो.
पहिल्या टप्यात उतार तीव्र असल्याने तसेच झाडांची दाटी असल्याने आपण 300 एक फूट लवकर उतरतो.
आणि पहिल्या टप्यात स्थिरावतो. खुणेसाठी इथे काही झोपड्या आहेत तसेच मोठ्या प्रस्तर शिळा आहेत. इथून सर्वात डावीकडचा रस्ता जातॊ गणपती घाटाकडे. पाऊण एक तासाची हि सरळ रानवाट पदरगडाच्या पायथ्यपासून पुढे सरकते. वाटेतला हा पदरगड एक वेगळा विषय होईल. या गडाला कलावंतिणीचा गड असेही म्हणतात। मधल्या खिंडीमधून इथे वर चढता येते.
अगदी डोक्यावर जाण्यासाठी तज्ज्ञ गिर्यारोहकांची मदत लागते. तूर्त पदरगडला वळसा घालून हि वाट तुम्हाला एका छोट्या गणपती मंदिराकडे घेऊन जाते. हे गणपतीचा मंदिर लक्ष्यात ठेवावे खुणेसाठी . इथून पुन्हा उतरंड सुरु होते ती थेट खांडस ला जाणाऱ्या डांबरी सडकेला मिळते।
डोंगर उतरल्यावर या सडकेवर चालणे हा सगळ्यात कंटाळवाणा प्रकार असतो.हा झाला गणपती घाटाचा मार्ग !!
शिडीच्या घाटाची नाळ आणि पाठीमागे दिसणारा पदरगड

दुसरा मार्ग हा खरा सह्याद्रीच्या मानकऱ्यांसाठी राखून ठेवलेला मार्ग !!
'
शिडीचा घाट' !! थरारक , चित्तथरारक , अवघड ,बिकट , रोमांचकारी असा काय काय विशेषण लावता येणारा हा घाट उतरायचा म्हणजे नजर उंचीला स्थिरावरलेली स्थिर हवी, पाय भक्कम हवेत आणि पोटाऱ्याच्या स्नायूंमध्ये ताकद हवी आत्मविश्वास हवा मात्र फाजील नसावा , माज तर बिलकुल नसावा, सह्याद्री उग्र आहे त्यामुळे इथे "चुकीला माफी नाही"
उंची, पाणी असले कसले फोबिया असलेले शहरी मावळे इथे अगदीच कुचकामी !!
तर अशा भन्नाट वाटेवरून जणांच्या बेत माझ्या मनात रुंजी घालत होता आदल्या रात्रीपासून !!
गणपती घाटाने या आधी 8, 9 वेळेला उतरून आणि चढून झाले होते तो मार्ग तोंडपाठ होता !! शिडीची घाटवाटा खुणावत होती. या वेळाचे सवंगडी स्थिरबुद्धीचे होते (प्रतीक देशपांडे , अनिकेत मारणे आणि श्रावण शिगांवी) सोबतच्या हिरकण्या बिचकणाऱ्या नव्हत्या उलट साहसी आणि पुढाकार घेणाऱ्या होत्या (गौरवी , अदिती) सोनिया हिमालयात BMC करून आलेली आणि अर्पिता इयत्ता पहिली दुसरीपासून सह्याद्रीमध्येच फिरणारी असे सवंगडी असल्यामुळे शिडीच्या वाटेनेच उतरावे हा विचार पक्का झाला !!
पदरवाडी गावातील झोपडे आणि मागे उभा असलेला रांगडा पदरगड
नागफणीवरून जिथे पहिला उतार संपतो जिथे खुणेच्या काही झोपड्या लागतात तिथून मधली वाट पदरवाडी गावात जाते . हे गाव अगदीच इटुकला , गावात घर फक्त 6, वस्ती सगळी महादेव कोळ्यांची ,
गावात स्वागत केला ते एका आज्जीबाईंनी, आणि आमच्या शिडीची वाट उतरणार म्हणताच त्यांनी सरळ सांगितलं नग जाऊस तिकङ लै वंगाळ वाट संवय नसलं कि डोळे फिरतात बघा ,
झाला आमच्या अर्ध्यावर असलेला आत्माविश्वास आता पावशेर झाला. आम्ही घुटमळलो, आम्ही म्हणाला सवय आहे तुम्ही फक्त वाटेल लावा , आज्जीनी काळजीनेच आम्हाला "वाटेला लावला" आणि पुढे आमची वाटच लागत गेली तो भाग वेगळा !!
पदरवाडीतील आजी त्यांच्या नाती आणि आमच्या सोबतच्या हिरकण्या !! (डावीकडून सोनिया, अदिती, गौरवी आणि अर्पिता)
 पदरवाडी गावातून डावीकडचा रस्ता शिडीच्या वाटेकडे जातो. वाटेवर एक भरलेली विहीर लागते (पाणी पिण्यायोग्य नाही)पण ती खूण म्हणून लक्ष्यात ठेवावी.
इथून खाली चिंचोळी पायवाट सुरु होते आणि इथूनच सुरु होतो शिडीच्या वाटेचा थरार .
सपाट कातळ भिंतीला चिटकून शिडीची वाट सरळ तीन टप्प्यात खाली उतरते. तीनही टप्पे अंदाजे 30 ते 40 फुटाचे सरळ सोट खाली उतरतात. एका बाजूला उन्हाने तापलेली कातळ भिंत तर दुसऱ्या बाजूला 800 फुटांची कराल दरी ! या दोन्हीच्या मधल्या जेमतेम एक फुटाच्या बेचक्यातून कातळ कपारी मध्ये पाय रोवत खाली उतरावे लागते. वरून खाली उतरताना पाय रोवण्यासाठी खालची जागा शोधावी लागते त्यासाठी तुम्ही अक्षरश त्या कातळ कड्याला एक प्रकारे लोंबकळत असता. ज्यांची उंची कमी किंवा वजन जास्त आहे त्यांना इथे नक्कीच अडचण होऊ शकते . खांद्यावरच्या रुकसॅकमुळे आमच्या अडचणीत थोडी भर पडली कारण एक तर पाठीवर भार पडत होता आणि घट्ट पकड मिळत नव्हती.
शेवटी दोन जण पुढे होऊन आधी सगळ्या सॅक उतरवून घेतल्या आणि मग माणसे उतरली.(सोनियाचे गिर्यारोहणाचे कौशल्य इथे खूप कामाला आले.)
हे तिन्ही कातळकडे उतरले कि एक छोटी गुहा लागते तिथे क्षणभर विसवावे. आपलेच धाडस आपल्याच चक्षूंनी न्याहाळून घ्यावे.
शिडीच्या वाटेची नाळ उतरली कि वाटेत बांधलेली शिडी ज्यामुळे कदाचित या वाटेला शिडीची वाट असे पडलेले असावे
इथून पुढची पायवाट सरळ सरधोपट आहे. मध्ये दोन ठिकाणी वाट तुटलेली आहे पण ती आडवी लोखंडी शिडी लावून साधलेली आहे त्यामुळे या वाटेला 'शिडीची वाट' म्हणले जात असावे . खाली काटेवाडी गाव लागते इथून डांबरी रास्ता खांडस ला उतरतो. काटेवाडी गावात मुक्कामासाठी मोठे मंदिर उपलब्ध आहे. पाण्याची सोय आहे. इथून ग्रामस्थांकडून कर्जत स्थानकापर्यंत जाण्यासाठी वाहनांची सोय होते.
असा हा भीमाशंकर चा कोकणकडा जेव्हा आपण खांडस मधून मागे वळून बघतो तेव्हा आपल्याच विश्वास बसत नाही कि कुठे होतो आपण कुठे आलो !!
समाप्त !!

Comments

Popular posts from this blog

मेंगाईसोबतची रात्र

कासवांचे गाव

The Neighbour Side -- Visit to Pakistan High Commission