आडवाटेवरच्या मंगळगडाचे दुर्गशिल्प

निसर्गने जे चित्र उलगडून ठेवले ते केवळ अवर्णनीय होते!! घाटातून वर चढणारे ढगांचे लोट, आजूबाजूची निरव शांतता, पाठीमागे त्या छोट्या दुकानांमधून सांडणारा बल्बचा पिवळसर मंद्सार प्रकाश आणि आमच्या पाठीमागे असणाऱ्या त्य प्रकाशामुळे त्य ढगांवर आमच्या सावल्या उमटल्या होत्या. ढग जसे लांब जात होते तसे तश्या आकृत्या मोठ्या होत जात अखेरीस आसमंतात विरून जात होत्या. ढगांच्या त्या पडद्यावर चालणारा तो चित्र सावल्यांचा खेळ संपला तो मागचा दिवा मालवल्यावारच !! क्षणात घाटात अंधार पसरला आणि आणि मग आम्ही त्यात बुडून गेलो. तिथून हलावेसे वाटत नव्हते . मात्र निघणे भाग होते, पुढे काय रस्त्यात काय वाढून ठेवले आहे याची कल्पना नव्हती.
वरंधा घाटाकडे जातानाची हिर्डोशीची खिंड,

शिवस्पर्शाने पावन झालेल्या गडांना आज इतिहासात मानाचे स्थान आहेच, पण याव्यतिरिक्त असेही अनेक गड-किल्ले अज्ञात इतिहासाच्या खुणा आपल्या अंगाखांद्यावर घेऊन उभे आहेत. भले या किल्ल्यांना इतिहासात शिवरायांचा सहवास लाभला नसेल, मात्र त्यांचा इतिहासही तितकाच अस्सल, रोमांचक व महत्त्वाचा आहे. अशाच एका आडवाटेवरच्या किल्ल्याची भ्रमंती... 
पा वसाळा सुरू झाला, की डोंगर भ्रमंतीचे वेध लागतात. हिरव्या पायवाटा खुणावू लागतात. पुण्या-मुंबईच्या जवळपास एका दिवसात जाता येतील असे बरेच प्रसिद्ध किल्ले आहेत. राजगड, तोरणा, पुरंदर, राजमाची, तुंग, तिकोना, शिवनेरी, लोहगड हे किल्ले आता सर्वांनाच माहिती आहेत. शनिवार - रविवार इथे प्रचंड गर्दी उसळलेली असते. हजार-दोन हजार लोक गडावर असतात. ट्रेकिंगच्या नावाखाली निसर्गाला मनसोक्त ओरबाडण्याचे काम बिनधास्त सुरू असते. मागच्याच आठवड्यात सिंहगडावरील पर्यटकांचा आकडा दहा हजार नोंदला गेला होता. 
जातिवंत भटक्‍याला अशा ठिकाणी गुदमरायला होते. ज्या कारणासाठी दुर्गभटकंती करायची, जी शांतता अनुभवायची, स्वतःशी संवाद साधायचा, शिवरायांच्या इतिहासाची उजळणी करायची हे सगळे उद्देशच या गर्दीत, कोलाहलात हरवून जातात. अशा वेळेला लाडक्‍या सह्याद्रीच्या आडवाटेवरची ही दुर्गशिल्पे आपल्याला खुणावत असतात. आपण फक्त त्यांच्या हाकेला प्रतिसाद द्यायचा आणि पावसाळ्यातल्या सौंदर्याची मनमुराद लयलूट करायची.
कदाचित राजगड किंवा रायगडासारखा समृद्ध ऐतिहासिक वारसा या अपरिचित किल्ल्यांना लाभला नसेल, शिवकालीन वास्तू किंवा स्थापत्यशास्त्राच्या सुंदर इमारती इथे उभ्या नसतील; तरीसुद्धा सह्याद्रीकडून मिळालेले जन्मजात रांगडेपण हे किल्ले बेलगामपणे मिरवत उभे असतात. त्यांच्या बिकट वाटांवरचा थरार अनुभवण्यासाठी तरी या किल्ल्यांवर अवश्‍य जावे. 
वरंधा घाटातून सह्याद्रीच्या घाटांचे दिसणारे विहंगम दृश्य आणि असरलेली घनदाट अरण्ये !!!

असेच एक दुर्गशिल्प वरंधा घाटाच्याखाली आहे. कांगोरी ऊर्फ मंगळगड नावाचा देखणा किल्ला शतकानुशतके एकटाच उभा आहे. याच्या वाटेला फारसे कोणी जात नसल्याने या वाटा मळलेल्या नाहीत; उलट काळाच्या ओघात त्या बुजतच चालल्या आहेत. अजून काही वर्षांत या वाटा पूर्णपणे पुसल्या जातील आणि हळूहळू यासारखे एक - एक दुर्गरत्न काळाच्या उदरात गडप होत जाईल. 
सह्याद्रीची पर्वतरांग ही दक्षिणोत्तर पसरली आहे आणि या रांगेला अनेक ठिकाणी पूर्व-पश्‍चिम फाटे फुटले आहेत. सह्याद्रीच्या अशाच एका पूर्व-पश्‍चिम फाट्यावर हा मंगळगड उभा आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची अंदाजे 2489 फूट आहे. जावळीचे चंद्रराव मोरे यांनी बांधलेला हा किल्ला, शिवाजी महाराजांनी 1656 मध्ये रायरी ताब्यात घेतल्यानंतर स्वराज्यात सामील झाला. हा किल्ला "कांगोरी' किंवा "कांगोरीगड' या नावाने स्थानिकांमध्ये प्रसिद्ध आहे. जावळीच्या जंगलात उभा असल्याने या किल्ल्याला जंगलाचे नैसर्गिक कवच मिळाले आहे. हे जंगल या किल्ल्याच्या दुर्गमतेत भर घालते. मंगळगड हा रायगडाच्या घेऱ्यात असल्याने शिवकाळात याचा उपयोग पहाऱ्याचे किंवा टेहळणीचे ठाणे म्हणून होत असे. अठराव्या शतकात काही इंग्रज अधिकाऱ्यांना मंगळगडावरच्या तुरुंगाची हवा चाखायला मिळाली होती. त्याआधी शिवकाळातसुद्धा कैद्यांना ठेवण्यासाठी मंगळगडाचा वापर केल्याचे उल्लेख इतिहासात आहेत. 1818 मध्ये हा गड इंग्रजांनी जिंकून घेतला आणि या किल्ल्याचा एकांतवास सुरू झाला. प्रतापगड, मकरंदगड, चंद्रगड, वासोटा हे या किल्ल्याचे जोडीदार जावळीच्या खोऱ्यात अलीकडे पलीकडे पसरले आहेत. रायरेश्‍वराजवळची अस्वल खिंड, कावळ्या किल्ल्याजवळचा वरंधा घाट या प्राचीन घाटवाटांवर लक्ष ठेवण्याचे काम मंगळगड करत असे. 

 यंदाच्या पावसाळ्यातील मानाचे पहिले पान कांगोरीच्या नावे लागले. बेत ठरला मंगळगडाचा. हा  "कांगोरी' ऊर्फ "मंगळगड' पुण्यापासून 135 किमी अंतरावर आहे. पुण्यातून कोकणात उतरताना भोर-महाड रस्त्यावर वरंधा घाट उतरला, की पुढे वरंध गाव लागते. त्या गावापासून पुढे सरळ रास्ता ढालकाठी गावाच्या फाट्यावर (अंतर सुमारे 15 किमी) जातो. या फाट्यापासून डावीकडे वळले, की पिंपळवाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव अंदाजे 14 किमी अंतरावर आहे. पुणे-महाड एसटी ढालकाठीच्या फाट्यावर थांबते इथून खासगी रिक्षा, जीप ही वाहने पिंपळवाडीला जायला मिळतात. मुंबईवरून येताना मुंबई-महाड एसटीने महाडपर्यंत यावे. महाडवरून भोरची एसटी पकडून ढालकाठीच्या फाट्यापर्यंत पोचता येते. वरंध गावाकडे यावे आणि ढालकाठी गावाच्या फाट्यावर पिंपळवाडीसाठी वळावे. पिंपळवाडी गाव छोटे, पण देखणं व आटोपशीर आहे. दुतर्फा असलेले डोंगर आणि भातशेतीला खेटून जाणारा रस्ता पिंपळवाडी गावात पोचतो. गावातल्या शाळेत मुक्कामाची सोय होते. या शाळेपासूनच सरळ एक रुंद कच्ची गाडी-वाट गडावर जाते. सहज ओळखू येईल अशा या वाटेचे पक्‍क्‍या रस्त्यात रूपांतर करण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. आम्ही गेलो तेव्हा अर्ध्या रस्त्यात सुरुंग लावून रस्ता करण्याचे काम जोरदार सुरू होते.  या सुरुगांच्या अावाजाने तो सगळा डोंगर हादरत होता. हाच रस्ता उद्या पिंपळवाडीचे माळीण करेल का अशी भीती उगाचच मनात तरळून गेली.  उद्या हाच रस्ता गडावर जाईल आणि हा गडसुद्धा सिंहगड आणि राजगडासारखा अतिक्रमणाच्या विळख्यात गुदमरून जाईल. निसर्गाच्या तडाख्यात हे जीर्ण शीर्ण होणारे गडकोट परवडले. या तडाख्यात इतिहास जरी नष्ट झाला, तरी पर्यावरण बचावते. मात्र, माणसाच्या आक्रमणाखाली हे गडकिल्ले, इथला इतिहास, पर्यावरण सगळेच झपाट्याने नष्ट होत आहे.
पहिला चढ चढून आल्यावर पठारावरून दिसणारा मंगळगड उर्फ कांगोरी


या रस्त्याच्या सुरवातीलाच उजव्या हाताला एक चर खोदला आहे आणि त्यावर पलीकडे जाण्यासाठी बांबूची शिडी आडवी टाकली आहे. ही शिडी सुरवातीलाच पार करून पलीकडे जावे. पलीकडे गेल्यावर ही वाट जंगलात शिरते आणि चढाईचा भाग लागतो. सुरवातीचा हा चढ चांगलीच दमछाक करतो.  चढ चढून गेलं  की आपण पठारावर पोचतो. या पठारावरून सरळ नाकासमोर मंगळगडाचा बालेकिल्ला दिसतो. नाकासमोरची ही वाट धरून सरळ पुढे चढत जावे. हा चढ तीव्र नसला, तरी सलग असल्यामुळे दमायला होते. हा चढ सरळ आपल्याला किल्ल्याच्या महादरवाजापाशी घेऊन जातो. आजमितीला गडाचा मुख्य दरवाजा अस्तित्वात नाही, तरी मोडकळीस आलेल्या पायऱ्या आणि बुरजांची जागा यामुळे या दरवाजाची कल्पना येऊ शकते. इथे जातानाची वाट चढताना काळजीपूर्वक चढावी, कारण एक तर ही वाट पावसाळ्यात प्रचंड घसरडी आणि भुसभुशीत होते आणि दुसरे कारण म्हणजे इथे आधारासाठी लावलेले कठडे तुटून दरीत पडल्यामुळे एका बाजूला खोल दरी, दुसऱ्या बाजूला कताळभिंत आणि पायाखालची निसरडी वाट अशा खिंडीत तुम्ही अडकता. तेव्हा चढाई करत असताना इथे गडबड, गोंधळ, अतिधाडस टाळावे. 
किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी दिसणारे तटबंदीचे अवशेष 
महादरवाजातून गडात प्रवेश केल्यावर दोन वाटा फुटतात. उजवीकडची वाट बालेकिल्ल्यावर जाते. बालेकिल्ल्यावर पाण्याचे टाके, तसेच पडलेल्या वाड्याचे जोत आहे. इथून मंगळगडाचे दृश्‍य, आजूबाजूचा परिसर फार अप्रतिम दिसतो. पसरत गेलेली सर्पाकृती माची, माचीची तटबंदी, माचीच्या टोकाला बसलेले छप्पर नसलेले भैरोबाचे मंदिर, मागे साचलेले काळे ढग, निळेशार आकाश, मागे पसरलेल्या विस्तीर्ण सह्याद्रीच्या रांगा हा सगळा कॅनव्हास निसर्गाने मांडून तयार ठेवलेला असतो. तुम्हाला हे निसर्गचित्र फक्त कॅमेऱ्याची कळ दाबून बंदिस्त करायचे असते. हे सगळे दृश्‍य फार सुंदर आणि खिळवून ठेवणारे दिसते. या बालेकिल्ल्यावर दोन पाण्याची टाकी आहेत. इथल्या टाक्‍यांतील पाणी हे बारा महिने पिण्यायोग्य असते. बालेकिल्ल्याला वळसा मारून पुन्हा मुख्य दरवाजापाशी यावे. इथून डावीकडची वाट किल्ल्यावरच्या मंदिराकडे जाते. दोन्ही बाजूला गुडघ्यापर्यंत वाढलेले हिरवेगार गवत आणि मधे उमटलेली काळी पायवाट तुम्हाला मंदिरापर्यंत नेते. मंदिराकडे जाताना उजव्या हाताला कातळात कोरलेले पाण्याचे टाके लागते. या टाक्‍यात उतरण्यासाठी कातळात पायऱ्यासुद्धा कोरलेल्या आहेत. या टाक्‍यांतील पाणी पिण्यायोग्य नाही. डाव्या हाताला कोरडे पडलेले अजून एक पाण्याचे टाके आढळते. संपूर्ण गडावर उभी असलेली एकमेव वास्तू म्हणजे हे मंदिर. या मंदिराला छप्परच नाही. काळाच्या ओघात ते नष्ट झाले. चार भिंती, दोन-चार पितळेच्या घंटा आणि गाभाऱ्याबाहेर उघड्यावरच मांडून ठेवलेले भैरोबा व देवीची मूर्ती इतकेच काय ते अवशेष आज इथे शिल्लक आहेत. इथे उघड्यावरच या मूर्ती मांडून ठेवल्या आहेत. उन्हा-पावसात त्या तशाच तग धरून आहेत. या मूर्तींचा इतिहास फारसा ज्ञात नाही. अर्धगोलाकार आकारात बांधून काढलेली मंदिराच्या दाराची कमान फार आकर्षक भासते. छायाचित्रीकरणासाठी ही कमान एक उत्तम चौकट पुरवते. पावसाळ्याचे चार महिने सोडले, तर इतर ऋतूत इथे मुक्कामाची सोय होऊ शकते. 
गडावरील भैरवनाथाचे छप्पर हरवलेले मंदिर

या मंदिरामागून एक पायवाट मागे उतरते. ती थेट गडाच्या माचीच्या टोकाशी जाते. गडावर राबता एकदम कमी असल्यामुळे, तसेच पावसाळ्यात गवत भरगच्च वाढत असल्यामुळे पायाखालची वाट तपासत शेवटपर्यंत जावे. इथे माचीच्या शेवटाला अर्धवर्तुळाकार बुरूज आहे. इथून जावळीच्या खोऱ्याचे, सह्याद्रीच्या रांगांचे विहंगम व मनोहारी दर्शन घडते. 
उघड्या आकाशाखाली बसलेल्या भैरवनाथ मंदिरामागून उतरत जाणारी तटबंदी आणि त्याच्यामागे जावळीच्या खोऱ्याचे मनोहारी दृश्य

इथून परतीच्या वाटेवर येताना पुन्हा किल्ल्याच्या दरवाजापाशी यावे. ज्या वाटेने आपण चढून आलेलो असतो त्याच वाटेने उतरायचे असते. मात्र, तीच वाट उतरताना वेगळी वाटायला लागते. विशेषतः पावसाळ्यात या उतरणीच्या वाटेवरून पाण्याचे ओहोळ वेगाने वाहत असतात. त्यामुळे ही वाट धोकादायकरीत्या घसरडी बनते, प्रसंगी जिवघेणीही ठरू शकते. किल्ल्याच्या वाटेवर, पायऱ्यांवर माती असल्यामुळे घसरून पडण्याचा आणि दुखापतीचा धोका असल्याने इथून उतरताना विशेष काळजी घ्यावी. 
किल्ला चढायला साधारणतः दोन तास लागतात. उतरताना दीड तासात तुम्ही पायथ्याच्या पिंपळवाडीत पोचता. किल्ला सबंध फिरायला, बघायला दीड तास पुरतो. वेळेचे नियोजन काटेकोररित्या केले तर पुणे आणि मुंबई दोन्ही ठिकाणाहून हा किल्ला एका दिवसात सहज बघून होतो. 
मंगळगडाचे मुख्य आकार्षांबिंदू असलेली तटबंदीचा बालेकिल्ल्यावरूनचा नजारा .

स्वतःचे वाहन असेल, तर सकाळी लवकर निघून एका दिवसात शिवथरघळ आणि मंगळगडाचा बेत सहज होऊ शकतो. वरंधा घाटाच्या खालीच वसलेली समर्थांची शिवथरघळ हे एक अत्यंत निसर्गरम्य ठिकाण आहे. याखेरीज वरंधा घाटात असलेला कावळा किल्ला हादेखील भटकंतीचे एक अपरिचित ठिकाण आहे. मात्र, या किल्ल्याची वाट ढासळल्यामुळे इथे जाताना माहितगाराला सोबत घेऊन जावे. 
पायथ्याचे गाव पिंपळवाडी.

इथून परतताना एक सुंदर अनुभव गाठीशी कायम बांधला गेला,. मंगळगडवरुन निघताना थोडा उशीरच झाला होता आणि पाऊस मी म्हणत होता.तसाच पावसाचा मार सोसत आम्ही वरंधा घाटात पोहचायला बरोबर दिवेलागण झाली होती. दिवसभर पोटात काहीही नव्हते आणि वरंधातल्या भजेवाल्यानी त्यांचा कारभार आटोपायला घेतला होता. दादापुता करून पोटभर भज्यांची ऑर्डेर दिली.. हे सगळे होईपर्यंत  निसर्गने जे चित्र उलगडून ठेवले ते केवळ अवर्णनीय होते!! घाटातून वर चढणारे ढगांचे लोट, आजूबाजूची निरव शांतता, पाठीमागे त्या छोट्या दुकानांमधून सांडणारा बल्बचा पिवळसर मंद्सार प्रकाश आणि आमच्या पाठीमागे असणाऱ्या त्य प्रकाशामुळे त्य ढगांवर आमच्या सावल्या उमटल्या होत्या. ढग जसे लांब जात होते तसे तश्या आकृत्या मोठ्या होत जात अखेरीस आसमंतात विरून जात होत्या. ढगांच्या त्या पडद्यावर चालणारा तो चित्र सावल्यांचा खेळ संपला तो मागचा दिवा मालवल्यावारच !! क्षणात घाटात अंधार पसरला आणि आणि मग आम्ही त्यात बुडून गेलो. तिथून हलावेसे वाटत नव्हते . मात्र निघणे भाग होते, पुढे काय रस्त्यात काय वाढून ठेवले आहे याची कल्पना नव्हती.
तिथून निघाल्यानंतर पाऊस जोरात सुरु झाला होता. मात्र नजर बर्यापैकी रूळल्यामुळे वेग पकडला होता. हिरडोशी गावाच्या अलीकडे आल्यानंतर रस्ता थोडा अरुंद झाला आणि गाडी अचानक घसरू लागली. आधी वाटले कि कदाचित पंक्चर असावे मात्र ते तसे नव्हते. अजून पुढे गेल्यावर घडू नये ते घडलेच आणि मागच्या सकट आम्ही गाडीवरून कधी जमिनीवर अलगद आलो हे कळेपर्यंत आम्ही चिखलात न्हाहून निघालो होतो. धडपडत उभे राहिलो गाडी उचलून जसे काही घडलेच नाही असा अविर्भावात पुन्हा प्रवास सुरु झाला. काही मीटर गेलो नाही तोवर रस्त्यात थोडी गर्दी दिसली. गाडी हळू केली आणि उतरलो तर गाडी पुन्हा सटकली, हि सटकासटकी काही थांबत नव्हती. शेवटी गाडी हातात घेऊन समोरच्या गर्दीपर्यंत पोहोचेपर्यंत तीन चार वेळा अजून गाडी सटकली , गाडीचा सोडा चालता सुद्धा येत नव्हते इतका रस्ता गुळगुळीत झाला होता. गर्दीपाशी गेल्यावर कळले कि या निसरडेपणामुळे एक स्कोर्पिओ आणि एक इंनोवा सुद्धा रस्तासोडून बाजूच्या चिखलात फसल्या होत्या आणि मोठे दोर लावून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न लोक करत होते. झाले असे होते रस्ता रुंदीकरणासाठी जो रस्ता खोडला होता त्यातली माती बाहेर काढून ठेवली होती ती तुफान पावसामुळे रत्यावर पसरून सबंध रस्ताच निसरडा झाला होता. शेवटी पुढचा दीड एक किलोमीटरचा भाग तसाच घसरत घसरत ओलांडला आणि सुटकेचा निश्वास टाकला. भोरला पोहचल्यावर चिखलाने लडबडलेले आमचे वेश बघून आम्हाला कोणी हॉटेलात घेईना !! डोंगर यात्रा करताना कुठली आपत्ती कधी कुठे कशी येऊ शकते याचा मिळालेला तो एक वस्तुपाठच होता.

सहभागी सदस्य : प्रतीक देशपांडे , गौरवी जोशी, कौस्तुभ सहस्त्रबुद्धे
-------------------------------------------------------------------------------
 सदर लेख सकाळ साप्ताहिकाच्या 16 जुलै 2016च्या अंकात प्रसिध्द झाला अाहे.

Comments

  1. शब्दातीत अनुभव सुद्धा इतका सुंदर मांडला आहेस.

    ReplyDelete
  2. Khup sundar mandle ahes.. 👌👌kangori la bhet denyachi utsukta vadhli..
    Photography pan mast..😊

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद नम्रता !!

      Delete
  3. Sundar .Now I can say that you are on the right track.

    ReplyDelete
  4. धन्यवाद मामासाहेब

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मेंगाईसोबतची रात्र

कासवांचे गाव

The Neighbour Side -- Visit to Pakistan High Commission