तोंडावरून पांघरूण घेऊन पडलेला मी झोपेच्या सीमेवर रेंगाळत असतानाच पायापासून ते थेट डोक्यापर्यंत काहीतरी हळुवार सरकत गेल्याची जाणीव मला झाली आणि क्षणभर खाडकन भानावर आलो. पांघरुणाच्या आतूनच मी कानोसा घेतला. त्या भयाण अंधारात अर्थातच पांघरून बाजूला करण्याची हिंमत त्यावेळी त्या क्षणी तरी माझ्यात नव्हती. आजूबाजूला काहीही हालचाल नव्हती. झालेल्या गोष्टीला भास मानत पांघरुणाच्या आतमध्ये मी मात्र आता टक्क जागा झालो होतो. --------------------------- वर्ष २००७ असेल , सह्याद्रीचा वारं नुकतंच कानात शिरलं होता. लोहगड, राजगड, तुंग, तिकोना सर झाले होते, पावसाळा सुरू झाला होता, जुलैचा महिना होता, नगरच्या महावीर कलादालनात पुस्तकांचे प्रदर्शन लागले होते. ट्रेकिंग ग्रुप सोबतचे ट्रेकिंग, ब्लॉग, इंटरनेट हे सगळंच (आर्थिकदृष्ट्या) आवाक्याबाहेर असल्यामुळे पुस्तके हेच संदर्भ ग्रंथ मानून डोंगरयात्रांचे बेत जमत होते, या पुस्तक प्रदर्शनात प्र.के.घाणेकरांचे "भटकंती किल्ल्यांचे" हे पुस्तक दिसले, खिशात पैसे नसायचे ते दिवस. जितके होते त्यात जमवून पुस्तक खरेदी केले. घरी आल्या आल्या तोरणा किल्ल्याचे पान...
Comments
Post a Comment